जवाहर कॉलनीत प्रेमसंबंधातील वादातून तलवारीने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:00 PM2019-01-11T12:00:22+5:302019-01-11T12:05:04+5:30
या घटनेत दोन्ही गटांतील पाच जण जखमी झाले
औरंगाबाद : प्रेमसंबंधामुळे झालेल्या वादातून प्रियकर प्रेयसीसह नातेवाईकांमध्ये जवाहर कॉलनीत बुधवारी रात्री तलवारबाजी झाली. या घटनेत दोन्ही गटांतील पाच जण जखमी झाले असून, जवाहरनगर पोलिसांनी याविषयी परस्परविरोधात गुन्हे नोंदवून तीन जणांना अटक केली.
तक्रारदार अविनाश धुराजी चिंधे (२८, रा. शिवाजीनगर, देवगिरी हिल्स) हे विवाहित असून, सुमारे वर्षभरापासून त्यांचे ओळखीच्या विधवेसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यावेळी त्याने तिचा आणि तिच्या मुलाचा सांभाळ करण्याचे आणि लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. काही महिन्यांपूर्वी अविनाश त्याच्या प्रेयसीला सोबत घेऊन गोव्यालाही गेला होता. त्यांच्यातील प्रेमसंबंधाची कुणकुण दोघांच्या नातेवाईकांना लागल्याने अविनाशने प्रेयसीला भेटून यापुढे संबंध ठेवायचे नाही, असे स्पष्टपणे सांगत तिच्यासोबत संभाषण बंद केले होते. लग्नाचे आमिष दाखवून अविनाशने आपली फसवणूक केल्याचे म्हणत प्रेयसी त्याच्याकडे लग्नासाठी आग्रही होती. यातून उभयतांमध्ये किरकोळ वाद झाला होता.
दरम्यान, ९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास प्रेयसीचा १७ वर्षीय मुलगा सुरेश (नाव बदलले) अविनाशच्या जवाहर कॉलनीतील दुकानात आला आणि शिवीगाळ करू लागला. तेथे अविनाशचा लहान भाऊ योगेशसोबत सुरेशचा वाद झाला. आणखी मुले घेऊन येतो आणि तुम्हाला दाखवितो, असे धमकावून सुरेश तेथून निघून गेला. ही बाब योगेशने अविनाशला फोन करून कळविली. त्यामुळे दुकान लगेच बंद कर, असे सांगून अविनाश योगेशला घेण्यासाठी दुकानावर गेला. त्याच वेळी कारमधून आलेल्या प्रेयसी, सुरेश, मुलाचे मित्र गोटू, गणेश आणि अन्य चार ते पाच जणांनी योगेशवर तलवारीने हल्ला चढविला.
तेव्हा योगेशच्या मदतीसाठी धावलेल्या अविनाशलाही त्यांनी तलवारीच्या म्यान आणि चामडी बेल्टने मारहाण केली. यावेळी रस्त्यावर एका हातात तलवारीचे पाते पकडून पडलेला अविनाश मदतीसाठी पोलीस, पोलीस म्हणून ओरडत होता. मात्र, कोणीही त्याच्या मदतीला धावले नाही. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी आरोपींच्या तावडीतून आपली सुटका केल्याचे अविनाशने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले.
तर पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, अविनाशने आपल्या मुलाला मारहाण केल्यामुळे त्याला जाब विचारण्यासाठी जवाहर कॉलनी येथे गेलो असता योगेश चिंधेने आपल्यावर तलवार उगारली. मात्र सुरेशने तलवार हातात पकडली. शिवाय त्यांनी मारहाण करून जखमी केले. सचिन हावळे याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद केले.