‘यह जवाहरनगर पुलिस थाना जैसे का वैसा ही है’; पोलीस आयुक्तांनी १५ वर्षांपूर्वीची काढली आठवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 02:34 PM2020-09-12T14:34:59+5:302020-09-12T14:45:19+5:30
ठाण्यातील सध्याची परिस्थिती पाहत न राहवून त्यांनी ठाण्याच्या दुर्दशेबद्दल मत व्यक्त केले.
औरंगाबाद : जवाहर पोलीस ठाण्यात पाय ठेवताच ‘ये पुलिस थाना जैसे का वैसा ही है’, असे उद्गार १५ वर्षांनंतर शहरात आलेले नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी काढले. डॉ. गुप्ता यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता अचानक जवाहरनगर पोलीस ठाण्याला भेट दिली. ठाण्यातील सध्याची परिस्थिती पाहत न राहवून त्यांनी ठाण्याच्या दुर्दशेबद्दल मत व्यक्त केले.
पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे हे आधीच ठाण्यात उपस्थित होते. सुमारे तासभर आयुक्त ठाण्यात होते. अचानक पोलीस आयुक्त आल्याने ठाण्यातील उपस्थित अधिकारी, कर्मचारी सावधान झाले. १५ वर्षांपूर्वी या ठाण्याची जशी अवस्था होती, तसेच विदारक चित्र आयुक्तांना पाहायला मिळाले. ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर उभी असलेली वाहने. तक्रारदारांचा बाहेर असलेला घोळका आणि पोलीस उभे, तर काही बसलेले दिसले. ठाणे अंमलदाराच्या केबिनमध्ये टेबलसमोर अर्जदाराला बसण्यासाठी ठेवलेला बेंच. आतमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना बसायला पुरेशी जागा नसल्याने अपुऱ्या जागेत केलेले पार्टिशन, डीबी पथकाच्या रूममध्ये अधिकारी, कर्मचारी बसलेले होते. ठाणे अंमलदार ते पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये जाण्याचा अरुंद रस्ता पाहून ‘ये पुलिस थाना जैसा का वैसा ही हैं’ असे उद्गार पोलीस आयुक्तांनी काढले.
सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे, डीबी पथकाचे उपनिरीक्षक भरत पाचोळे आणि बंदोबस्तासाठी हजर असलेले पोलीस उपनिरीक्षक वाघ आदी अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. कोरोना साथरोगाने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जागेअभावी सोशल डिस्टन्सिंंग राखणे शक्य होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वर्धन घोडे खून प्रकरणाचा तपास मॉडेल तपास म्हणून ओळखला जातो. ही घटना जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे पोलीस आयुक्तांना समजले. वर्धन घोडे खून प्रकरणाची तपास फाईल मागविली. ठाणेदार पोलीस निरीक्षक संतोष पाटील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीनिमित्त बाहेर असल्याने त्यांना ही फाईल पाहता आली नाही. यावेळी त्यांनी संपूर्ण ठाणे पाहताना अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या.
१९९३ पासून पोलीस ठाणे किरायाच्या इमारतीत
१९९३ पासून जवाहरनगर पोलीस ठाणे किरायाच्या इमारतीमध्ये सुरू आहे. शासकीय इमारतीत हे ठाणे व्हावे याकरिता आतापर्यंत एकाही अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला नाही. परिणामी, आज नव्या पोलीस आयुक्तांना १५ वर्षांनंतरही या ठाण्यात कोणताही बदल जाणवला नाही.