जवान विजय पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:03 AM2021-03-31T04:03:26+5:302021-03-31T04:03:26+5:30
चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील भूमिपुत्र विजय ज्ञानेश्वर पवार-शिंपी (३१) यांचे २८ मार्चला सायंकाळी ...
चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील भूमिपुत्र विजय ज्ञानेश्वर पवार-शिंपी (३१) यांचे २८ मार्चला सायंकाळी पाच वाजता मणिपूर येथे कर्तव्यावर असताना निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्व पंचक्रोशीत होळी सणाच्या संध्येला शोककळा पसरली.
महाराष्ट्रासह जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी निर्बंध घातले आहेत. मात्र, ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी कोरोनाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.
अत्यंत मनमिळावू स्वभावाचा तरुण जवान आपल्या कुटुंबाला सोडून गेला. वीर जवान विजय पवार यांचे पार्थिव मुंबईमार्गे मंगळवारी चिंचोली लिंबाजी येथे मूळ गावी सकाळी दहा वाजता दाखल झाले. त्यांच्यावर चिंचोली लिंबाजी येथील स्मशानभूमीत दुपारी बारा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी अखेरची सलामी व मानवंदना दिली.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक वर्षाची मुलगी, पुणे येथे पोलीस दलात कार्यरत असलेला भाऊ, भावजय असा परिवार आहे. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आमदार उदयसिंग राजपूत, तहसीलदार संजय वारकड, पिशोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश बोराडे, करण राजपूत, जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील, उपसरपंच जगन्नाथ पवार यांची उपस्थिती होती. या प्रसंगामुळे सर्व तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
फोटो : पासफोटो
300321\img-20210330-wa0131_1.jpg
जवान विजय पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार