जायकवाडी ५३.५३ टक्क्यांवर; पिण्याच्या, उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 02:30 PM2021-09-11T14:30:34+5:302021-09-11T14:33:15+5:30
Heavy Rainfall in Marathawada : जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय, दोन लाख शेतकरीदेखील धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत.
औरंगाबाद: मराठवाड्यासह ( Marathwada ) औरंगाबादची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam ) ५३.५३ टक्के पाणीसाठा सध्या झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे साठा ( Heavy Rainfall in Marathawada ) वाढल्याने पिण्याच्या आणि उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न सध्या मिटला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ टक्के जलसाठा अद्याप कमी आहे. गेल्या वर्षी १० सप्टेंबर रोजी धरणात ९८ टक्के जलसाठा होता.
जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय, दोन लाख शेतकरीदेखील धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील गावे, औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १५० एमएलडी पाणीपुरवठा होतो. तर उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात उपसा होतो. सध्या धरणात ११६२ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त जलसाठा आहे. २१७० दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठ्याची धरणाची एकूण क्षमता आहे. यंदाच्या पावसाळ्यात ६०९ मि.मी. पाऊस धरण क्षेत्रात झाला असून, गेल्या वर्षी ७०१ मि.मी. पाऊस धरण क्षेत्रात झाला होता.
हे प्रकल्प भरले आहेत तुडुंब
निम्न दुधना ९६ टक्के, येलदरी १०० टक्के, सिद्धेश्वर ९७ टक्के, माजलगाव ९४ टक्के, मांजरा ८४ टक्के, पेनगंगा ९६ टक्के, मानार १०० टक्के, निम्न तेरणा ७२ टक्के, विष्णुपुरी ९२ टक्के हे प्रकल्प तुडुंब झाले आहेत. सीना कोळेगाव १५ टक्के तर खडका बंधाऱ्यात १०० टक्के आणि शहागड बंधाऱ्यात ४९ टक्के पाणी आले आहे.
गेला खरीप, यंदाच्या रबीला आठ आवर्तने दिली
जायकवाडी धरणातून रबी आणि खरीप हंगाम मिळून ८ आवर्तने (पाणीपाळी) सोडण्यात आले. रबी हंगामातील शेवटची पाणीपाळी फेब्रुवारीअखेरीस संपली. १ मार्च ते ३१ जुलै २०२१ पर्यंत पाणी वितरण करण्यात आले. १२७९ दलघमी पाणी सिंचनासाठी आहे. रबी हंगामात १ लाख ४६ हजार ९०० हेक्टर तर खरीप हंगामासाठी ५३ हजार हेक्टरसाठी हे पाणी दिले. नांदूर मधमेश्वर कालवा, निम्न दुधना या प्रकल्पातील पाणीवाटपाचा विचार यात केला होता. यंदाच्या पावसाळ्यापर्यंत सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने पाणी दिले. यंदा धरणात ५३.५३ टक्के जलसाठा असल्यामुळे रबी २०२२ व खरिपाला किती पाणी सोडण्यात येईल, हे आताच सांगता येणे अवघड आहे.