जायकवाडी धरण @ ५४.२८ टक्के; पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसाने आवक वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 12:18 PM2024-08-27T12:18:48+5:302024-08-27T12:19:27+5:30
धरण निम्मे भरल्यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.
पैठण ( छत्रपती संभाजीनगर) : जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत या धरणाची पाणी पातळी ४९.८६ टक्क्यांवर पोहोचली होती. तर मंगळवारी सकाळी ८ वाजता पाणीपातळी ५४. २८ टक्क्यांवर गेली आहे. सध्या या धरणात ९३ हजार ३२८ क्युसेकने पाणी येत असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.
मागील वर्षापेक्षा यावर्षी दोन महिने अगोदर धरणात ५० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये हे धरण निम्मे भरले होते. गेल्या वर्षी हे धरण पूर्ण पावसाळ्यात ५५ टक्के भरले होते. सोमवारी सकाळी दहा वाजता या धरणात ९६ हजार ३३८ क्युसेकने पाणी येत होते. मात्र दुपारनंतर आवक कमी होत ६६ हजार ६६६ क्युसेकवर आली.
दरम्यान, मंगळवारी सकाळी पुन्हा आवक वाढत जाऊन ९३ हजार ३२८ क्युसेकवर गेली आहे. सध्या धरणात जिवंत पाणीसाठा १७७८.४३१ दलघमी आहे. हे धरण निम्मे भरल्यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.