जायकवाडी ९२ टक्के भरले; आवक जास्त असल्याने धरण पूर्ण भरण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 07:27 PM2019-09-11T19:27:20+5:302019-09-11T19:29:46+5:30
जायकवाडी आता फक्त दिड फूट रिकामे
पैठण : जायकवाडी धरणात आज ३४९३९ क्युसेक अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू असून एका दिवसात जलाशयात पाच टक्के वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाचा जलसाठा ९२.१५% झाला आहे.जायकवाडी आता फक्त दिड फूट रिकामे असून जायकवाडी धरणात येणारी आवक लक्षात घेता धरण पूर्ण भरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे काठोकाठ भरलेल्या तेथील धरणसमूहातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी व प्रवरा नद्या दुथडी भरून वहात्या झाल्या या नद्यांचे पाणी सोमवार पासून जायकवाडी धरणात दाखल होत आहे. आज या दोन्ही नद्यांचे पाणी ३४९३९ क्युसेक क्षमतेने जायकवाडी धरणात दाखल होत असल्याने दिवसभरात गतीने जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे दिसून आले.
नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर, वालदेवी व कडवा या धरण समूहातून होणारा एकत्रित विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून १७८४५ क्युसेक विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत होता हे सर्व पाणी जायकवाडीत दाखल होत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, व मुळा धरणातून होणारा एकत्रित विसर्ग ओझर वेअर मधून ७९८८ क्युसेक करण्यात येत होता हे ही पाणी जायकवाडी धरणात दाखल होत आहे.१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी बुधवारी सायंकाळी ६ वा १५२०.५६ फूट झाली होती. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त दिड फूट पाण्याची गरज आहे. धरणात एकूण जलसाठा २७३८.७३२ दलघमी ( ९६.७० टीएमसी) झाला असून यापैकी जीवंत जलसाठा २०००.६२६ दलघमी (७०.६४ टीएमसी) आहे. धरणाचा जलसाठा ९२.१५% झाला आहे.