जायकवाडी धरण ९५ टक्के भरले; कोणत्याही क्षणी दरवाजे उघडू शकतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 01:43 PM2020-09-03T13:43:56+5:302020-09-03T13:45:06+5:30
ऊर्ध्व भागातून धरणात होणारी आवक लक्षात घेता गुरुवारी (दि. ३) जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची दाट शक्यता आहे.
पैठण : जायकवाडी धरणात येणारी आवक लक्षात घेता कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उचलून गोदावरी पात्रात विसर्ग करावा लागणार असल्याने गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थ व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, अशा लेखी सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी प्रशासकीय यंत्रणेला दिली आहे.
जायकवाडी धरण ९५ टक्के भरले असून, ऊर्ध्व भागातून धरणात होणारी आवक लक्षात घेता गुरुवारी (दि. ३) जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची दाट शक्यता आहे. आवक लक्षात घेऊन अगोदर धरणाच्या कालव्यातून, तसेच जलविद्युत प्रकल्पाच्या सांडव्यातून विसर्ग केला जाईल व त्यानंतरच धरणाचे दरवाजे वर उचलून विसर्ग करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जायकवाडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. बुधवारी धरणात ८७८७ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. दरम्यान, बुधवारी सायंकाळी नांदूर-मधमेश्वर बंधारा (नाशिक) मधून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग ३२२८ क्युसेक असा घटविण्यात आला आहे.