जायकवाडी तुडूंब, तरीही वर्षभरापासून विद्युत निर्मिती बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 11:59 AM2021-12-24T11:59:24+5:302021-12-24T12:00:43+5:30

जलसाठा असताना प्रकल्प बंद ठेवण्याची नामुष्की, दररोज १२ मेगावॉट विजेची तूट

Jayakwadi Dam Full, however, stopped generating electricity for a year | जायकवाडी तुडूंब, तरीही वर्षभरापासून विद्युत निर्मिती बंद

जायकवाडी तुडूंब, तरीही वर्षभरापासून विद्युत निर्मिती बंद

googlenewsNext

पैठण : गेल्या वर्षभरापासून जायकवाडी धरणावरील (Jayakwadi Dam) जलविद्युत प्रकल्पाची दुरुस्ती सुरू असल्याने विद्युत निर्मिती बंद आहे. धरणात जलसाठा उपलब्ध असताना वर्षभर प्रकल्प बंद ठेवण्याची नामुष्की महापारेषण कंपनीवर ओढवली आहे. चाळीस वर्षांपूर्वी जपानी बनावटीच्या मशिनरीमध्ये दुरुस्ती सुरू असताना अनेक पार्ट निकामी झाल्याचे समोर येत आहे. या मशिनरीचे तंत्रज्ञही लवकर उपलब्ध होत नसल्याने हा जलविद्युत प्रकल्प कधी चालू होईल, याबाबत मात्र अनिश्चितता निर्माण झाली आहे.

डिसेंबर २०१९ पासून जलविद्युत प्रकल्पाला ग्रहण लागले. १०० फूट खोलीवर असलेल्या जलविद्युत प्रकल्पातील टर्बाईनच्या सपोर्ट बेरिंग निकामी झाल्याने प्रकल्प बंद पडला. त्यातच टर्बाईनचे रनर नादुरुस्त झाले. सध्या हे रनर काढायचे काम सुरू असून, यानंतर आणखी काय खराब झाले हे समोर येईल, असे उपकार्यकारी अभियंता उमेश सोनी यांनी सांगितले. दरम्यान, दुरुस्ती लवकरच होईल; मात्र किती दिवसात होईल, याबाबत त्यांनी निश्चित कालावधी सांगितला नाही. जलविद्युत प्रकल्प बंद आहे. यामुळे दररोज १२ मेगावॉट विजेची तूट राज्य विद्युत वितरण प्रणालीला सोसावी लागत आहे. प्रकल्पातून वीजनिर्मितीचे काम सन १९८४-८५ पासून सुरू आहे. जलविद्युत केंद्रातून निर्माण झालेली वीज राज्य विद्युत वितरण प्रणालीला पुरविण्यात येऊन आत्यंतिक गरजेच्या वेळेस राज्याच्या वीजपुरवठ्यात भर घालण्यात येते. दररोज सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ५ ते ८ अशी सर्वसाधारण या केंद्रातून विद्युत निर्मिती केली जाते. यासाठी १.१ दलघमी पाण्याचा वापर केला जातो. मात्र देखभाल व नियोजनाचा अभाव असल्याने हा प्रकल्प दोन वर्षांपासून बंद पडलेला आहे.

रिव्हर्सिबल टर्बाइनचे एकमेव वीजनिर्मिती केंद्र
जपानी बनावटीची रिव्हर्सिबल टर्बाइन जायकवाडी येथील विद्युतनिर्मिती प्रकल्पाचे अनोखे वैशिष्ट्य असूूून, भारतातील अशाप्रकारचे हे पहिलेच वीजनिर्मिती केंद्र आहे. रिव्हर्सिबल टर्बाइनमुळे धरणातील पाण्याचा उपयोग करून दिवसा वीज निर्मिती करता येते. तर याच रिव्हर्सिबल टर्बाइनला रात्रीच्यावेळेस पंप म्हणून कार्यान्वित करून धरणातून नदीत सोडलेले पाणी पुन्हा धरणात आणता येते. दिवसभरात सकाळी व संध्याकाळी विजेच्या अधिक गरजेच्यावेळी नाथसागरातील पाण्याचा उपयोग करून विद्युत निर्मिती करण्यात येते.

सांडव्याची भिंत व पिचिंग ढासळली
सामाजिक कार्यकर्ते विष्णू ढवळे व पैठण तहसीलदार यांना महापारेषणने दिलेल्या लेखी पत्रात पाटबंधारे खात्याने धरणातून विसर्ग केल्याने जलविद्युत प्रकल्पाच्या सांडव्याची भिंत व पिचिंग ढासळले असून, हे काम पूर्ण झाल्याशिवाय जलविद्युत प्रकल्प चालू करता येणार नाही असे म्हटले आहे. यामुळे जलविद्युत प्रकल्पाचे अधिकारी प्रकल्प कधी सुरू होईल, यावर ठाम नसल्याची चर्चा होत आहे.

Web Title: Jayakwadi Dam Full, however, stopped generating electricity for a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.