जायकवाडी धरणाची पातळी २५ टक्क्यांवर; चार दिवसांत पावणेपाच टीएमसीने जलसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:20 PM2018-07-21T12:20:17+5:302018-07-21T12:20:59+5:30
गेल्या चार दिवसांत नाशिक जिल्ह्यातून दाखल झालेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणातील जलसाठ्यात ४.७९ टीएमसीने भर पडली आहे.
पैठण ( औरंगाबाद) : गेल्या चार दिवसांत नाशिक जिल्ह्यातून दाखल झालेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणातील जलसाठ्यात ४.७९ टीएमसीने भर पडली आहे. शुक्रवारी सायंकाळी धरणाचा जलसाठा २५.०५ टक्के एवढा झाला आहे.
यंदाच्या सत्रात १७ जुलै रोजी प्रथमच जायकवाडी धरणातपाणी दाखल झाले. गेल्या चार दिवसांपासून धरणात आवक सुरू असून धरणात नव्याने दाखल झालेल्या पाण्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात १३५.९२७ दलघमी (४.७९ टीएमसी)ने वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाने विश्रांती घेतली असून तेथील धरण समुहातून होणारा विसर्ग घटविण्यात आला आहे. आज गंगापूर ११०० व दारणा धरणातून १५०० असा नाममात्र विसर्ग करण्यात येत होता. नांदूर -मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग ६३०० क्युसेसपर्यंत घटविण्यात आला. यामुळे गोदावरीची पाणीपातळी घटली असून धरणात येणारी आवक घटली आहे.
शुक्रवारी सायंकाळी धरणाची पाणीपातळी १५०४ फूट व ४५८.५४१ मीटर एवढी झाली होती. धरणात एकूण जलसाठा १२८२.०९३ दलघमी (४५.२७ टीएमसी) एवढा झाला असून यापैकी ५४३.९८७ (१९.२०)दलघमी उपयुक्त जलसाठा झाला आहे.