जायकवाडी तुडुंब, आवक वाढल्याने १८ दरवाजे उघडले; तब्बल ९ हजार ४३२ क्युसेकने विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 04:04 PM2024-09-10T16:04:14+5:302024-09-10T16:05:03+5:30

जायकवाडी धरणात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.

Jayakwadi dams 18 doors open as inflow increases; As many as 9 thousand 432 cusecs discharge | जायकवाडी तुडुंब, आवक वाढल्याने १८ दरवाजे उघडले; तब्बल ९ हजार ४३२ क्युसेकने विसर्ग

जायकवाडी तुडुंब, आवक वाढल्याने १८ दरवाजे उघडले; तब्बल ९ हजार ४३२ क्युसेकने विसर्ग

पैठण : येथील जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने सोमवारी दुपारी १२:३० आणि सायंकाळी ७ आणि मंगळवारी सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास उघडण्यात आले असून, त्यामधून ९ हजार ४३२ क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आवक वाढल्याने सोमवारी दिवसभरात एकूण १२ दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडण्यात आली होती. त्यानंतर आज, मंगळवारी सकाळी आणखी ६ दरवाजे अर्ध्या फूट उंचीने उघडून विसर्ग वाढविण्यात आला. धरणात होणारी आवक लक्षात घेत विसर्ग आणखी वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.

जायकवाडी धरणात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. सोमवारी जायकवाडी धरणात वरच्या धरणातून १० हजार ७४६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीसाठा दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास ९७.६९ टक्क्यांवर पोहोचल्यानंतर प्रशासनाच्या वतीने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अभियंता दिगंबर रायबोले, पोलिस निरीक्षक संजय देशमुख, नामदेव खराद, शाखा अभियंता विजय काकडे, गणेश खरडकर, गणेश वाघमोडे यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून धरणाचे गेट क्रमांक १०, २७, १८, १९, १६ व २१ असे ६ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून ३ हजार १४४ क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 

आवक वाढल्याने एकूण १८ दरवाजे उघडले
सोमवारी पुन्हा धरणात पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी ७ वाजता धरणाचे १४, २३, १२, २५, ११ व २६ असे आणखी ६ असे एकूण १२ दरवाजे उघडून नदीपात्रातून एकूण ६ हजार ८८८ क्युसेकने पाण्याचा गोदापात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळी ११. ३० ते १२ वाजेदरम्यान धरणाचे १३, २४, १५, २२, १७ आणि २० असे एकूण १८ दरवाजे अर्ध्या फुट उंचीने उघडून ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. यानंतरही धरणात पाण्याची आवक वाढल्यास गोदावरी पात्रात विसर्ग वाढवण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव म्हणाले.

धरणाच्या खालील ६ बंधारे भरले
धरणाची पाणी पातळी १५२१.५८ फूट आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २८५०.८८८ दलघमी असून, उजव्या कालव्यातून ६०० क्युसेकने पाण्याचा गेल्या काही दिवसांपासून विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीवर पैठण ते नांदेड दरम्यान १८ बंधारे आहेत. यापैकी सहाही बंधारे भरले असल्यामुळे या बंधाऱ्यांद्वारे हे पाणी सरळ नांदेडकडे निघाले आहे. १९७६ पासून आतापर्यंत जायकवाडी धरण १४ वेळेस शंभर टक्के भरले आहे.

Web Title: Jayakwadi dams 18 doors open as inflow increases; As many as 9 thousand 432 cusecs discharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.