जायकवाडी धरण ८५ टक्के भरल्यावर उघडणार दरवाजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 07:32 PM2020-08-24T19:32:09+5:302020-08-24T19:34:33+5:30
जायकवाडी धरणाचा जलसाठा ८०% झाला असून उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडीत आवक सुरू आहे.
पैठण : धरणाचा जलसाठा ८५ % झाल्यानंतर धरणात येणारी आवक लक्षात घेऊनच जायकवाडी धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची वेळ आल्यास निर्माण होणाऱ्या पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने दक्ष रहावे अशा सूचना उपविभागिय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी आपत्ती व्यवस्थापन बैठकीत बोलताना दिल्या.
जायकवाडी धरणाचा जलसाठा ८०% झाला असून उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडीत आवक सुरू आहे. अशा परिस्थितीत जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची वेळ आल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य पुर परिस्थितीचा आढावा घेऊन उपाय योजना करण्या संदर्भात सोमवारी प्रशासकीय यंत्रणेची उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन बैठक घेण्यात आली. बैठकीसाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके, जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, गटविकास अधिकारी विजय लोंढे, धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, बंडू आंधारे, पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज, कृषी अधिकारी सोनवणे आदी शासकीय खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
जायकवाडी प्रशासनाचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन
जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणाखालील पाच किलोमीटर पर्यंतचा पूर नकाशा व धरणातून एक ते आडिच लाख क्युसेक्स पर्यंत विसर्ग केल्यास पुराने बाधीत होणाऱ्या पैठण शहरातील क्षेत्र याचे पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी बैठकीत केले. दरम्यान धरणाखालील चनकवाडी बंधाऱ्याचे दरवाजे काढून ठेवण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.
महत्त्वाचे अधिकारी गैरहजर..
पुरपरिस्थितीत महत्वाची भूमिका असलेले आरोग्य खाते, महावितरण, परिवहन, दूरसंचार, पाचोड व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदी महत्त्वाचे अधिकारी आजच्या बैठकीला हजर नव्हते.
विद्युत रोषणाई होणार नाही
जायकवाडी धरणाच्या सांडव्यावर विद्युत रोषणाई करू नका असे स्पष्ट आदेश आज उपविभागीय अधिकारी पैठण यांनी जायकवाडी प्रशासनास दिले आहेत. पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा धरणाच्या सांडव्यावर विद्युत रोषणाई करण्यास परवानगी नाकारली असल्याचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी सांगितले. सांडव्यावरील विद्युत रोषणाईचा जायकवाडी धरणाचा पँटर्न देशभरात राबविण्यात येत असून यंदा मात्र जायकवाडी धरणावरच विद्युत रोषणाईस मनाई करण्यात आल्याने पैठण करांचा मोठा हिरमोड झाला आहे.
बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
- पैठण शहर व गोदाकाठच्या १४ गवात पूर रेषा रेखाटने.
- पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी बोट व लाईफ जँकेट उपलब्ध ठेवणे. - बँकवाटरचे पाणी लगतच्या गावात शिरू नये म्हणून उपाय योजना करणे.
- संदेश वहन यंत्रणा सज्ज ठेवणे.
- पोहणाऱ्यांचे पथक तैनात करणे.
- स्वयंसेवी समाजसेवी संस्थांची मदत घेणे.
- जेसीबी, पोकलेन, हायवा ट्रक व दळणवळण यंत्रणा उपलब्ध ठेवणे.
- स्थलांतर करण्यासाठी एसटी बसेस कार्यान्वित करणे.
- पूर बाधीतांची तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, मठ, धर्मशाळा, मंदिरे आदी राखीव ठेवणे.
- मुबलक धान्यसाठ्याची तरतूद करणे आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.