पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ६० टक्क्यांवर; आणखी आवक सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 03:51 PM2017-08-22T15:51:20+5:302017-08-22T15:54:39+5:30
औरंगाबाद, दि. २२ : मराठवाड्यात शनिवारी व रविवारी अशा दोन दिवसात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. यासोबतच पैठणच्या जायकवाडी धरणाच्या ...
औरंगाबाद, दि. २२ : मराठवाड्यात शनिवारी व रविवारी अशा दोन दिवसात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. यासोबतच पैठणच्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.
मंगळवारी सकाळी झालेल्या नोंदीप्रमाणे धरणाची पाणी पातळी ६०.१६ टक्क्यांवर पोहोचली आहे. यासोबतच धरणाच्या वरील प्रदेशातून २६,६६६ क्युसेक या क्षमतेने पाण्याची आवक सुरु आहे. मागील ४८ तासात १० टक्के पाण्याची भर पडल्याने धरण साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. आवक अशीच राहिली तर धरण पूर्ण क्षमतेने भरू शकते.
दोन ते अडीच महिन्याच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाचे जोरदार आगमन झाले. तसेच धरणाच्या वरील भागातूनही मोठ्याप्रमाणावर पाणीसाठा धरणात येत आहे. सध्या धरणात २६,६६६ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू अस आज सकाळी १० वाजता जलसाठा ६०% पेक्षा पुढे गेला होता. दरम्यान, मंगळवारी नाशिक व नगर जिल्ह्यातील धरण समुहातून होणारा विसर्ग घटविण्यात आला आहे. त्यातच गेल्या २४ तासात जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने धरणात येणारी आवक घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नांदूर मधमेश्वर वेअरमधून गोदावरीत ११ हजार तर ओझर वेअर मधुन प्रवरा नदीत २५०० क्युसेक्स पर्यंत विसर्ग आज घटविण्यात आला आहे. गेल्या २४ तासात स्थानिक पाणलोट क्षेत्रापैकी शिर्डी, राहता, कोतुळ आदी भागात सरासरी ४५ मि.मी पावसाची नोंद झाली असून हे पाणी दुपार पर्यंत धरणात येत राहिल. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची आज सकाळी पाणीपातळी१५१३.८७ फूट ऐवढी झाली होती. धरणात एकूण जलसाठा २०४४.३०२ दलघमी झाला असून या पैकी १३०६.१९६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.