जायकवाडीच्या जलसाठ्याने ओलांडली पासष्टी ; मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 05:21 PM2024-08-28T17:21:44+5:302024-08-28T17:22:17+5:30

आवक वाढल्याने गोदावरी नदीकाठावरील वैजापूर तालुक्यातील १७ गावांना सतर्कतेचे आदेश

Jayakwadi Dam's water reservoir has exceeded sixty-five percent; The water problem in Marathwada will be solved | जायकवाडीच्या जलसाठ्याने ओलांडली पासष्टी ; मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटणार

जायकवाडीच्या जलसाठ्याने ओलांडली पासष्टी ; मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटणार

पैठण ( छत्रपती संभाजीनगर) : जायकवाडी पाणलोट क्षेत्रासह नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे बुधवारी दुपारी धरणाची पाणी पातळी ६५.६१ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. धरणात ७७ हजार ५७९ क्युसेकने पाण्याची आवक होत असून मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.

मागील वर्षी धरण केवळ ५५ टक्के भरले होते. मात्र, यावर्षी ऑगस्ट महिन्यातच या धरणात ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. आणखी एक महिना पावसाळा आहे. यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील गंगापूरमधून ५२० क्युसेक, भावली ४८१, भाम २ हजार ९९०, वालदेवी १८३, वाकी ८५३, कडवा ३ हजार २९२, आळंदी २४३, नांदूर मधमेश्वर ३९ हजार १६९, भोजापूर ९१०, होळकर ब्रीज २ हजार २१, पालखेड ३ हजार ९०८, वाघाड २ हजार २७५, तिसगाव ३२२, पुणेगाव १ हजार ३०० आणि ओझरखेड धरणातून १ हजार ३२० क्युसेक पाणी हे नागमठाण धरणात येत आहे. तेथून त्याचा गोदावरी पात्रात विसर्ग केला जात आहे.

नगर जिल्ह्यातील धरणातून असे येते पाणी
नगर विभागातील भंडारदरा ६ हजार ९५०, निळवंडे ८ हजार ७४४, मुळा १० हजार, ओझर वेअर ९ हजार ७६९, आडाळा ७८ आणि मजमेश्वर केटीवेअरमधून ३ हजार ६०० क्युसेक पाणी देवगड बंधारा येथे आल्यानंतर ते गोदावरी नदीत सोडले जात आहे. तेथून हे पाणी जायकवाडी धरणात येते.

यापूर्वी असे भरले होते धरण
१९७५ पासून धरण शंभर टक्के बारा वेळेस, ५० टक्क्यांच्या पुढे १६ वेळेस आणि २००५ ते २००८ हे तीन वर्षे शंभर टक्के धरण भरले होते. त्यानंतर २०१८ ते २०२२ हे सलग तीन वर्षे धरण शंभर टक्के भरले होते.

वैजापूर तालुक्यातील १७ गावांना सतर्कतेचे आदेश
गोदावरी नदीकाठावरील वैजापूर तालुक्यातील बाबतरा, डोणगाव, नांदूरढोक, लाखगंगा, पुरणगाव, बाभुळगावगंगा, सावखेडगंगा, अव्वलगाव, हमरापूर, नागमठाण, बाजाठाण, चेंडूफळ, भालगाव, चांदेगाव, डागपिंपळगाव, शनिदेवगाव व वांजरगाव या १७ गावांना महसूल प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Jayakwadi Dam's water reservoir has exceeded sixty-five percent; The water problem in Marathwada will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.