जायकवाडीची पाणीपातळी जोत्याखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:28 AM2019-03-12T00:28:47+5:302019-03-12T00:29:16+5:30

चिंता : धरणात केवळ २.११ टक्केच जलसाठा शिल्लक; झपाट्याने पाण्याचे बाष्पीभवन

 Jayakwadi water level cloth! | जायकवाडीची पाणीपातळी जोत्याखाली!

जायकवाडीची पाणीपातळी जोत्याखाली!

googlenewsNext

संजय जाधव
पैठण : तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने जायकवाडी जलाशयातील बाष्पीभवन प्रक्रियेत वाढ झाली आहे. सरासरी दरवर्षी बाष्पीभवन प्रक्रियेत जवळपास ११ टीएमसी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. बाष्पीभवनाने सर्वाधिक पाण्याची तूट होणारा जायकवाडी हा राज्यातील एकमेव प्रकल्प असून, जायकवाडीतील जलसाठा आज रोजी जोत्याखाली गेल्याने बाष्पीभवन प्रक्रियेने पाण्याची होणारी तूट चिंतेचा विषय बनला आहे.
जायकवाडी धरणात आज रोजी केवळ २.११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. धरणात ४५.९३९ दलघमी म्हणजेच १.६२ टीएमसी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणीपातळी सोमवारी रात्री ८ वाजता १४९५.४७ फूट एवढी होती. १४९४.५० फुटानंतर धरणाचा मृतसाठा सुरू होतो. मृतसाठ्यामध्ये जाण्यासाठी आकडेवारीनुसार आज धरणामध्ये एक फूट पाणीपातळी शिल्लक असली तरी धरणाची पाणीपातळी आजच जोत्याखाली गेली असल्याचे दिसून आले. येत्या १० दिवसांत ‘डेडस्टॉक’मधून पाणी उचलण्याची वेळ येणार आहे. पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये मृतसाठ्यातून (-१३ टक्के) पाणी उचलावे लागले होते. यंदा मात्र २०१४ पेक्षा भीषण परिस्थिती असून, मृतसाठ्यातून धरणावर अवलंबून असलेल्या सर्वांचे भागेल का, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पाणीपुरवठ्यापेक्षा बाष्पीभवन जास्त
जायकवाडी धरणातून सर्व पाणीपुरवठा योजनेसह औद्योगिक वसाहतींंना मिळून होणाऱ्या पाणीपुरवठ्यापेक्षा बाष्पीभवन प्रक्रियेने सहापट जास्त पाणी नष्ट होत आहे. जलाशयातील पाणी अशा पद्धतीने वाया जाऊ नये म्हणून बाष्पीभवन प्रक्रियेची गती मंदावण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. बाष्पीभवन प्रकियेत येथून पुढे सतत वाढ होणार हेही निश्चित आहे.
दरम्यान, यंदा धरणातील जलसाठा जोत्याखाली गेल्याने काटकसरीने पाणी वापरण्याची गरज आहे. येणाऱ्या हंगामात प्रत्यक्षात पाऊस कसा राहील, हे सांगता येत नसल्याने धरणात असलेला जलसाठा भविष्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून सिंचनासाठी १२०० क्युसेक, तर उजव्या कालव्यातून ६०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
पाचपट बाष्पीभवन
जायकवाडी धरणातून औरंगाबाद, जालना, पाथर्डी, अंबड व विविध गावांसह औरंगाबाद, वाळूूज, पैठण, शेंद्रा आदी औद्योगिक वसाहतींसाठी दररोज एकूण ०.२८५ दलघमी एवढा पाणीपुरवठा केला जातो. आजच्या तारखेला बाष्पीभवन प्रक्रियेत याच्या पाचपट पाणी नष्ट होत आहे.
राज्यात सर्वाधिक बाष्पीभवन होणारा प्रकल्प
जायकवाडी जलाशयाचा पानपसारा ३५,००० हेक्टर अशा विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेला आहे. शिवाय या जलाशयाची खोली कमी आहे. यामुळे सूर्यकिरणे या जलाशयात खोलवर जातात व विस्तीर्ण क्षेत्र असल्याने या जलाशयातील बाष्पीभवनाचे प्रमाण इतर धरणांतील जलाशयाच्या मानाने जास्त होते, असे जायकवाडीचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले. जायकवाडी हे नैसर्गिक बलस्थान असलेल्या जागेवरील धरण नसून ते मानवनिर्मित जागेवरील धरण असल्याने या धरणाची खोली कमी व क्षेत्र जास्त पसरलेले आहे. राज्यातील इतर धरणांची खोली जास्त व क्षेत्र कमी असल्याने तेथील जलाशयात बाष्पीभवन प्रक्रिया कमी होते, असे माजी कालवा सल्लागार विठ्ठलराव थोरात यांनी सांगितले.
मार्च ते मेदरम्यान बाष्पीभवन जास्त
जायकवाडी धरणातून दररोज जेवढे पाणी पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी लागते त्याच्या पाचपट सध्या बाष्पीभवन होत आहे. मार्च ते मे दरम्यान तापमानात मोठी वाढ होऊन हे बाष्पीभवन आठपटीने वाढते. धरणातून पाण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी सहा दिवस जेवढे पाणी लागते, तेवढे पाणी एका दिवसात बाष्पीभवन प्रक्रियेत निघून जात असल्याचे गेल्या काही वर्षांतील बाष्पीभवनाच्या नोंदीवरून समोर आले आहे. सरासरी १.५ दलघमी पाणी दररोज बाष्पीभवन प्रक्रियेत कमी होणार आहे, हे गृहीत धरल्यास या सरासरीनुसार मार्च ते मे या ९२ दिवसांत १३८ दलघमी (४.८७ टीएमसी) पाणी केवळ बाष्पीभवन प्रक्रियेत निघून जाणार आहे.
बाष्पीभवन प्रक्रियेला प्रतिबंध करणे अवघड
बाष्पीभवन प्रक्रियेची गती कमी करण्यासाठी रासायनिक केमिकल फवारण्याचा अवलंब केला जातो; परंतु जायकवाडीचा पानपसारा हा ३५ हजार हेक्टर असा विस्तीर्ण असल्याने या जलाशयात अशी उपाययोजना करणे अवघड असल्याचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.
सोलार प्लेटचा वापर?
जायकवाडी धरणातून बाष्पीभवन प्रक्रियेने जलाशयातील पाण्याची होणारी हानी लक्षात घेता काय करता येईल, यावर जायकवाडी प्रशासन गेल्या चार वर्षांपासून विचार करीत आहे. मराठवाडा विकास महामंडळाच्या बैठकीत जलाशयाच्या विस्तीर्ण पाणपसाºयावर तरंगत्या सोलार प्लेट टाकून बाष्पीभवन प्रक्रियेचा वेग घटवता येईल, यावर विचारविनिमय झाला होता; मात्र तरंगत्या सोलारचा प्रयोग प्रत्यक्षात शक्य नसल्याचे समोर आल्याने याबाबत काहीच निर्णय झाला नसल्याचे भगोर्देव यांनी सांगितले.
चौकट...
गेल्या सात दिवसांत झालेले बाष्पीभवन
---------------------------------
तारीख बाष्पीभवन (दलघमी)
५/३/१९ - ०.९४७
६/३/१९ - ०.८३२
७/३/१९ - ०.८५७
८/३/१९ - ०.९२४
९/३/१९ - ०.८४९
१०/३/१९ - ०.९१५
११/३/१९ - ०.९२४

Web Title:  Jayakwadi water level cloth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.