परळी औष्णिक केंद्रासाठी जायकवाडीचे पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 05:21 PM2019-08-12T17:21:41+5:302019-08-12T17:23:19+5:30
औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यांतील लाभक्षेत्राला फायदा
पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी रविवारी दुपारी १०० क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. दरम्यान, येत्या २४ तासांत टप्प्याटप्प्याने या विसर्गात वाढ करण्यात येईल, असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.
डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. जायकवाडीच्या पाणीपातळीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून, धरणात आवकही ६० हजार क्युसेकपेक्षा जास्त सुरू असल्याने जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, शाखा अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, आर. ई. चक्रे आदींनी कालव्याचे दरवाजे उघडून १०० क्युसेक क्षमतेने विसर्गास प्रारंभ केला. दुपारी २ वाजेच्या सुमारास पुन्हा १०० क्युसेक क्षमतेने विसर्ग वाढवून तो २०० क्युसेक करण्यात आला.
100 तीन दिवसांनी पोहोचणार पाणी
बीड जिल्ह्यातील परळी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी जायकवाडीच्या जलसाठ्यात आरक्षण आहे. नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे तीन संच गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने विद्युत केंद्राने डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडावे, अशी मागणी जायकवाडी प्रशासनाकडे नोंदविली होती. जायकवाडी भरत आल्याने विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी खडका धरणात पोहोचण्यासाठी साधारणपणे ३ दिवस लागतात.