पूर्ववैमनस्यातून दुचाकीस्वारावर चाकुने हल्ला करणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 09:16 PM2018-11-20T21:16:21+5:302018-11-20T21:16:38+5:30
वाळूज महानगर: पूर्ववैमनस्यातून दुचाकीस्वारावर चाकुने हल्ला करुन फरार झालेला धीरज गायकवाड याला मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मुकुंदवाडी परिसरात जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून धारदार चाकू जप्त करण्यात आला असून, अन्य एका साथीदाराचा शोध सुरु आहे.
वाळूज महानगर: पूर्ववैमनस्यातून दुचाकीस्वारावर चाकुने हल्ला करुन फरार झालेला धीरज गायकवाड याला मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मुकुंदवाडी परिसरात जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून धारदार चाकू जप्त करण्यात आला असून, अन्य एका साथीदाराचा शोध सुरु आहे.
वाळूज एमआयडीसीत २ नोव्हेंबर रोजी फिर्यादी आकाश वाकडे (२० रा. साजापूर) हा दुचाकी (एम.एच.२०, ई.सी.२७४०) वर त्याचे मित्र किशोर बन्सोडे व धम्मपाल पगारे (२१) यांना सोबत घेऊन झांबड चौकातून जात होता. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास धीरज गायकवाड (२४ रा.संघर्षनगर, मुकुंदवाडी) व त्याच्या अन्य एका साथीदाराने आकाश वाकडे याची दुचाकी अडवून पूर्ववैमनस्यातून वाद घातला.
या भांडणात धीरज गायकवाड याने चाकू काढुन आकाश वाकडे याच्यावर चाकुने वार करुन त्यास गंभीर जखमी केले. यात मध्यस्थी करीत असताना आरोपींनी किशोर बन्सोडे याच्यावरही हल्ला करुन त्यास जखमी करुन दोघे पसार झाले होते. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर तरुण दिसून आल्यामुळे आरोपींचा शोध सुरु होता.
या हल्लयात सहभागी असलेल्या आरोपीची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली. त्यानंतर मंगळवारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख उपनिरीक्षक राहुल रोडे यांच्या पथकाने मुकुंदवाडी परिसरात सापळा रचला. संशयित हल्लेखोर दिसताच पोलीस पथकाने झडप टाकून दुपारी १.३० वाजेच्या सुमारास आरोपी धीरज गायकवाड यास जेरबंद केले. पोलिसी खाक्या दाखविताच धीरज याने आपण साथीदाराच्या मदतीने आकाश वाकडे व किशोर बन्सोडे यांच्यावर चाकुने हल्ला केल्याची कबुली दिली. त्याने राहत्या घरी लपवून ठेवलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे.