प्रवास्यांनी खचाखच भरलेली काळीपिवळी जीप उलटली; 15 प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 01:25 PM2019-11-29T13:25:32+5:302019-11-29T13:30:50+5:30
परिसरातील नागरिक व शेतकरी आणि इतर वाहनधारकांनी तात्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले.
सिल्लोड: सिल्लोडवरून घाटनांद्राकडे भरधाव वेगाने जाणारी काळीपिवळी जीप १२ वाजेच्या दरम्यान धानोरा फाट्यानजीक चाक निखळल्याने उलटली. प्रवास्यांनी खचाखच भरलेली जीप ( क्रमांक एम एच 20- 149 )रस्त्यावर दोन ते तीन वेळेस उलटली असल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. यात जीपमधील 15 ते 20 प्रवासी जखमी आहेत.
परिसरातील नागरिक व शेतकरी आणि इतर वाहनधारकांनी तात्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले. तसेच जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील काही जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कालबाह्य झालेली वाहने आणि अप्रशिक्षित चालक
सिल्लोड कन्नड , सिल्लोड अजिंठा, सिल्लोड भराडी रस्त्यावर मागील बऱ्याच दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे.रस्ते खराब झाल्याने बसची संख्या कमी झाली यामुळे अवैद्य वाहतूक बोकाळली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवले जातात. यामुळे अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात सापडत आहे. यातच कालबाह्य झालेली भंगार वाहने चालक वापरतात. यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.