महिलेच्या पर्समधून दागिने लांबविले
By Admin | Published: June 19, 2014 12:41 AM2014-06-19T00:41:07+5:302014-06-19T00:52:26+5:30
सिल्लोड : बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रवासी महिलेच्या पर्समधून ७० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना सिल्लोड बसस्थानकावर घडली.
सिल्लोड : बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रवासी महिलेच्या पर्समधून ७० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास सिल्लोड बसस्थानकावर घडली. याप्रकरणी प्रवासी महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नसरीन रईस शेख (२५), रा.भोकरदन, जि.जालना ही विवाहित महिला माहेरी बोरगाव सारवणी येथून आईसोबत बुधवारी सिल्लोड येथे कपडे व सोन्या-चांदीचे दागिने घेण्यासाठी आली होती. खरेदी संपल्यानंतर सदर महिला बोरगाव सारवणी येथे जाण्यासाठी बसस्थानकावर आली. दुपारी ५ वाजेच्या सुमारास सिल्लोड-कन्नड बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पर्सची चेन उघडून त्यातील दोन तोळे सोन्याचे नेकलेस, ५० भार चांदीचे पायातील चैन असे अंदाजे ७० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. बसमध्ये चढल्यानंतर पर्सची चेन उघडी दिसली.
पर्समध्ये बघितले असता दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. दागिने चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात येताच सदर महिला प्रचंड घाबरली. बसस्थानकावरील प्रवाशांनी चोरट्यांचा बराच शोध घेतला; पण प्रवाशांना चोरीचा प्रकार कळेपर्यंत दागिने चोरून चोरटे पसार झाले होते. बसमध्ये चढताना एका अज्ञात महिलेने सदर महिलेला दरवाजामध्ये हेतुपुरस्सर अडथळा निर्माण केला. तो पर्यंत महिलेच्या पाठीमागील एका अज्ञात महिलेने पर्सची चेन उघडून दागिने लंपास केल्याची माहिती सदर महिलेने दिली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक एस.बी. नाईक करीत आहेत. (वार्ताहर)