‘आयोलाल झुलेलाल’चा घोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:01 AM2018-03-20T01:01:49+5:302018-03-20T11:08:13+5:30

पांढरी शुभ्र वस्त्रे आणि डोक्यावर पारंपरिक फेटा अन् टोपी, ढोल-ताशांचा गजर, बॅण्ड पथकाच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई आणि सोबत ‘आयोलाल झुलेलाल’चा जयघोष, अशा जल्लोषमय वातावरणात भव्य शोभायात्रा काढून सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री झुलेलाल यांची १०६८ वी जयंती सोमवारी (दि. १९) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Jhulelal birth anniversary celebreted | ‘आयोलाल झुलेलाल’चा घोष

‘आयोलाल झुलेलाल’चा घोष

googlenewsNext

औरंगाबाद : पांढरी शुभ्र वस्त्रे आणि डोक्यावर पारंपरिक फेटा अन् टोपी, ढोल-ताशांचा गजर, बॅण्ड पथकाच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई आणि सोबत ‘आयोलाल झुलेलाल’चा जयघोष, अशा जल्लोषमय वातावरणात भव्य शोभायात्रा काढून सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री झुलेलाल यांची १०६८ वी जयंती सोमवारी (दि. १९) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शोभायात्रेत छत्र्यांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि सजीव देखाव्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

श्री झुलेलाल भगवान यांच्या जयंतीनिमित्त सिंधी समाज व झुलेलाल सेवा समितीतर्फे सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६ वाजता श्री झुलेलाल भगवान यांचा पंचामृत स्नान सोहळा पार पडला. त्यानंतर ६.१५ वाजता प्रभात फेरी काढण्यात आली. ८.३० वाजता सामूहिक आरती करण्यात आली. सकाळी ११ वाजता कंवर कुटियाँ येथून वाहन रॅली काढण्यात आली.

जवाहर कॉलनी, क्रांतीचौक, सिटी चौक, सराफा, शहागंज, लक्ष्मण चावडीमार्गे या वाहन रॅलीचा सिंधू भवन येथे समारोप झाला. चांदीच्या मूर्तीच्या पंचामृत स्नानानंतर सायंकाळी ६ वाजता शहागंज येथील वरुणदेव जलाश्रम येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी सिंधी समाज अध्यक्ष किशनचंद तनवाणी, कल्याणदास माटरा, झुलेलाल सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू तनवाणी, सचिव भरतलाल निहालानी, उपाध्यक्ष राजू परसवाणी, आनंद दयालानी, शंकरलाल गुनवाणी, विनोद चोटलानी, शंकर बजाज, सेवकराम तोलवाणी, आनंद दयालानी, देवानंद मदनानी, पुरुषोत्तम इसराणी, बाबू कारिया, राजा रामचंदानी, प्रकाश किंगर, शिव तोलवाणी, श्रीचंद मलकानी, जगदीश बजाज, अमृतलाल नाथानी, विनोद गुणवानी, अजय तलरेजा आदी उपस्थित होते.

शोभायात्रेच्या अग्रभागी पालखीमध्ये भगवान झुलेलाल यांची चांदीची मूर्ती विराजमान होती. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या रथात प्रतिमा ठेवण्यात आली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी आकर्षक छत्र्यांची सजावट, त्यातून होणाऱ्या रोषणाईने शोभायात्रेचा मार्ग उजाळून जात होता. शहरात प्रथमच अशाप्रकारच्या आकर्षक छत्र्या शोभायात्रेत पाहण्यास मिळाल्या. त्यामुळे या छत्र्या पाहण्यात अनेक जण दंग झाले. बॅण्ड पथकाच्या सादरीक रणावर अनेकांनी ठेका धरला. शोभायात्रा जसजशी पुढे सरकत होती, तसा जल्लोष वाढत होता. मोंढा नाकामार्गे सिंधी कॉलनी येथे शोभायात्रेचा समारोप झाला. येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. जयंतीनिमित्त शहागंज येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Web Title: Jhulelal birth anniversary celebreted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.