जिन्सीत पाच वाहने आगीत जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:36 AM2017-11-15T00:36:11+5:302017-11-15T00:36:15+5:30
जिन्सी पोलीस ठाण्यासमोरील रिकाम्या जागेवर अचानक आग लागली. या आगीत ५ वाहने त्याचप्रमाणे फ्रीज रिपेअरिंगच्या दुकानातील फ्रीज जळून राख झाले असून, फक्त पत्र्याचे सांगाडेच शिल्लक राहिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिन्सी पोलीस ठाण्यासमोरील रिकाम्या जागेवर अचानक आग लागली. या आगीत ५ वाहने त्याचप्रमाणे फ्रीज रिपेअरिंगच्या दुकानातील फ्रीज जळून राख झाले असून, फक्त पत्र्याचे सांगाडेच शिल्लक राहिले आहेत. अग्निशामक विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणली इतर वाहने नागरिकांनी वेळीच बाजूला काढल्याने बरेच नुकसान टळले.
जिन्सी पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर ही घटना मंगळवारी रात्री २ वाजेच्या सुमारास घडली. रिकामी जागा असल्याने या रस्त्यावर ट्रक, टेम्पो, रिक्षा, लोडिंग वाहने उभी केली जातात. येथे कच-याचे ढीगदेखील असून, आग लागण्याचे कारण अद्याप पोलिसांनाही कळले नाही.
आगीचा रौद्रावतार वाढला. फ्रीजच्या दुकानात १५ डी फ्रीज व किमान ४० च्या जवळपास लहान फ्रीज होते. तेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीच्या जवळ असलेली इतर वाहने नागरिकांनी काचा फोडून दूर हटविली. आगीच्या रौद्रावतार अग्निशामक दलाच्या बंबाने पाण्याच्या मारा करून शमविला; परंतु कारचा पूर्णत: सांगडा झाला, तर आॅटोरिक्षा (एमएच-२० एए-३६१३), लोडिंग अॅपेरिक्षा (एमएच-२० एटी४०८८), टेम्पो ४०७ (एमएच-२० ए-५६१०) आदी वाहने जळाली, तर एक मॅजिक (एमएच-२० सीएस- ६४१६) हीदेखील आगीत थोडीफार जळाली आहे. मारुती कारचा तर नंबरदेखील कुणाला सांगता आला नाही. स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आल्याने व बहुतांश चारचाकी वाहने नागरिकांनी काचा फोडून आगीपासून दूर केल्याने त्या गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून बचावल्या.
आगीचे कारण गुलदस्त्यात
जिन्सीच्या रस्त्यावर विविध गाड्या पार्क केलेल्या असतात. येथे अचानक आग लावण्यात आली की, कुणी लावली याचे कारण पोलिसांनी उशिरापर्यंत स्पष्ट केले नाही. पोलिसांनी आगीच्या घटनेची फक्त नोंद घेतली असून, कुणीही सायंकाळपर्यंत तक्रार देण्यासाठी पुढे आले नसल्याचे जिन्सी पोलिसांनी सांगितले.
गुन्हे शाखेचा ताफा हजर
जिन्सी येथे लागलेल्या आगीची खबर पसरली अन् गुन्हे
शाखेचे सहायक पोलीस
आयुक्त रामेश्वर थोरात व त्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.