परीक्षेत तोतयागिरी करून मिळविली बालविकास विभागात नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:54 PM2019-07-17T23:54:56+5:302019-07-17T23:55:16+5:30
संरक्षण अधिकारीपदाच्या लेखी परीक्षेत तोतयागिरी करून महिला व बालविकास विभागात संरक्षण अधिकारीपदावर एक जणाने नोकरी मिळविल्याचे समोर आले. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
औरंगाबाद : संरक्षण अधिकारीपदाच्या लेखी परीक्षेत तोतयागिरी करून महिला व बालविकास विभागात संरक्षण अधिकारीपदावर एक जणाने नोकरी मिळविल्याचे समोर आले. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
विशाल उत्तम राठोड (संरक्षण अधिकारी कनिष्ठ, ता. किनवट, जि. नांदेड), परीक्षा देणारा सुलतान सालेमिया बारब्बा (रा. नांदगाव, ता. लातूर) आणि मध्यस्थ प्रबोध मधुकर राठोड (रा. मांडवी, ता. किनवट, जि. नांदेड) अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले की, नांदेड येथील एका प्रकरणाचा तपास करीत असताना महिला व बालविकास विभागाने संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) या पदासाठी ७ सप्टेंबर २०१४ रोजी औरंगाबादेतील धर्मवीर संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रावर परीक्षा झाली होती. विशाल उत्तम राठोड या उमेदवाराऐवजी आरोपी सुलतान सालेमिया बारब्बा याने लेखी परीक्षा दिली होती. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत विशालचे नाव आले. शासनाने ३ जुलै २०१७ रोजी विशालला महिला व बालविकास विभागात संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) या पदावर नेमणूक दिली. तेव्हापासून विशाल हा शासकीय सेवेत आहे. दरम्यान राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने एका प्रकरणात केलेल्या तपासात आरोपी विशाल राठोड यानेही स्वत:च्या जागेवर डमी उमेदवार परीक्षेस बसवून नोकरी मिळविल्याचे समोर आले होते. या केसमध्ये आरोपी प्रबोध राठोड याने विशाल आणि सुलतान यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबतचा अहवाल सीआयडीने महिला व बालविकास विभागाला कळवून याविषयी निर्णय घेण्याचे सुचविले होते. महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार औरंगाबाद महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त मारोती केरबा शिरसाट यांनी १६ जुलै रोजी सिडको पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडे दिला.
बनावट हॉल तिकीट तयार केले
परीक्षेत तोतयागिरी उघड होऊ नये, याकरिता आरोपींनी मोठ्या शिताफीने कट रचून त्याची अंमलबजावणी केल्याचे निष्पन्न झाले. विशाल राठोडच्या प्रवेशपत्रासारखेच दुसरे बनावट प्रवेशपत्र तयार केले. या प्रवेशपत्रावर विशालच्या छायाचित्राच्या जागेवर आरोपी सुलतानचे छायाचित्र चिकटविले. त्यावर सुलतानने विशाल राठोडच्या नावाने परीक्षा दिली. यासोबत अन्य बनावट ओळखपत्रही त्यांनी सोबत नेले होते.