बेरोजगार तरुणाई शोधतेय यशरूपी ‘विठ्ठल’, चार पैशांसाठी कपाळी टिळा लावण्याचे काम
By संतोष हिरेमठ | Published: July 18, 2024 07:18 PM2024-07-18T19:18:32+5:302024-07-18T19:18:57+5:30
येवल्याहून छत्रपती संभाजीनगरात आले ४० तरुण : कोणी बारावी पास, कोणी पदवीधर, स्पर्धा परीक्षेची काहींकडून तयारी
छत्रपती संभाजीनगर : काही जण शेतमजुरी करतात. कोणी बारावी पास, तर कोणी पदवीधर. काहींनी तर पोलिस भरतीतही आपले नशीब अजमावले. मात्र, आयुष्यात यशरूपी विठ्ठलाचे दर्शन घडण्याची प्रतीक्षाच आहे. असे एक, दोघे नव्हे, तर तब्बल ४० तरुण. हे तरुण छोट्या पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या वारकरी, भाविकांच्या कपाळी अष्टगंध, बुक्का याचा टिळा लावत होते. घरी काही पैसे नेता येतील, या आशेने येवल्याहून हे सर्व तरुण शहरात दाखल झाले होते.
छोट्या पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या कपाळावर टिळा लावण्यासाठी नगर नाका ते वाळूजपर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी हे तरुण उभे होते. टिळा लावण्यासाठी ते हात पुढे करीत होते, तसे वारकरी थांबत होते. हे काम दिवसभर सुरू होते. टिळा लावल्यानंतर काही भाविक तरुणांच्या हातातील डब्यात काही पैसे टाकत होते, तर काही जण तसेच पुढे रवाना होत होते. डब्यात पडणाऱ्या पैशांकडे क्षणभर पाहून तरुण लगेच पुढच्या भाविकांकडे वळत होते.
पदवीधर अनिलने पोलिस भरतीत अजमावले नशीब
येवल्यातील खैरगव्हाण येथील अनिल वाघ या २१ वर्षीय तरुणाने नुकतेच नाशिक येथील पोलिस भरतीत स्वत:चे नशीब अजमावले. यश मिळण्याची प्रतीक्षा आहे. तो कधी शेतात मजुरी, तर कधी केटरिंगचे काम करतो. प्रत्येक भरती प्रक्रियेत तो प्रयत्न करीत आहे. छोट्या पंढरपूर येथे वारकऱ्यांना टिळा लावून चार पैसे मिळतील, यासाठी तो मित्रांसह मंगळवारी रात्रीच शहरात दाखल झाला होता. नगर रोडवर दिवसभर रस्त्यावर उभा राहून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तो टिळा लावत होता.
रमेश म्हणाला, ‘पाऊस नसल्याने काम मिळेना.’
येवल्यातील रमेश म्हणाला, ‘शेतात काम करून चार पैसे मिळवितो; परंतु पाऊस नसल्याने कामच मिळत नाही. दिवसात हजार ते बाराशे रुपये मिळतील म्हणून भाविकांना टिळा लावण्यासाठी येथे आलो.’
बारावी पास, अर्धा एकर शेती, नाइलाजाने आलो
बारावी पास असलेला रवींद्र ठाकरे म्हणाला, ‘अर्धा एकर शेती आहे. सध्या मूग लावला आहे. दिवसभरात काही पैसे मिळतील म्हणून येथे आलो. येण्या- जाण्यासाठी पाचशे रुपये जातील; परंतु किमान पाचशे रुपये उरतील.’