'रिपब्लिकन'चे नवे समीकरण; जोगेंद्र कवाडे यांच्याकडून एकनाथ शिंदे गटासोबत युतीचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 12:28 PM2022-07-06T12:28:33+5:302022-07-06T12:30:35+5:30
आता जी ताजी राजकीय उलथापालथ झाली, त्याचे आम्ही स्वागत करतो. सत्तेचे वारंवार परिवर्तन होत राहिले पाहिजे.
औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांची युती होण्याचे संकेत मंगळवारी येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे पत्रपरिषदेद्वारे दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आमची सतत उपेक्षाच केली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सुभेदारी गेस्ट हाऊसवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कमिटीची बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, आता जी ताजी राजकीय उलथापालथ झाली, त्याचे आम्ही स्वागत करतो. सत्तेचे वारंवार परिवर्तन होत राहिले पाहिजे. आता गतिमान विकासाची अपेक्षा आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त केले आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करेन, असे ते म्हणाले आहेत. त्यांची ही भूमिका आम्हाला आवडली आहे. परंतु हिंदू, हिंदुत्व हा घोळ आम्हाला कळत नाही. हिंदू धर्म आहे, पण ‘हिंदुत्व- हिंदुत्व’ केल्याने अन्य धर्मीयांच्या मनात भीती निर्माण होते, त्याचे काय ? हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणवाद हे लक्षात घेतले पाहिजे. धर्माचा बाऊ न करता विकासाचा अजेंडा राबवला पाहिजे. संविधानाची मर्यादा ओलांडता कामा नये, अशी अपेक्षा यावेळी प्रा. कवाडे यांनी व्यक्त केली.
कवाडे यांनी केलेल्या मागण्या :
एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळाली नाही. ती तत्काळ मिळावी,
नवीन शहरे निर्माण करून संभाजीराजे व थोर पुरुषांची नावे देण्यात यावीत, दादर रेल्वेस्थानकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, पुणे शहराला म. फुलेनगर हे नाव द्यावे, नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावे, दलित अत्याचारात ४० टक्के वाढ झाली आहे, त्याविरुद्ध कठोर पाऊले उचलावीत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीची प्रभाग पद्धती रद्द करण्यात यावी, ‘डॉ. बामू’ला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा.
पत्रपरिषदेस महाराष्ट्राचे प्रभारी गोपाळराव आटोटे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, महासचिव ॲड. जे. के. नारायणे, मराठवाडा अध्यक्ष गणेशराव पडघन, चरणदास इंगोले, बापूराव गजभारे, राजाभाऊ इंगळे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रत्ना मोहोड, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे आदींची उपस्थिती होती.