जोगेश्वरी ग्रामपंचायतीची करवसुली मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:40 PM2019-05-16T22:40:04+5:302019-05-16T22:40:15+5:30
चालु अर्थिक वर्षात कर वसुलीसाठी जोगेश्वरी ग्रामपंचायतीने मोहीम हाती घेतली आहे.
वाळूज महानगर : चालु अर्थिक वर्षात कर वसुलीसाठी जोगेश्वरी ग्रामपंचायतीने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत कारखानदारांना नोटिसा बजावण्याचे काम ग्रामपंचायतीच्या वतीने सुरु करण्यात आले आहे.
जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत एकूण १५४ कारखाने असून, या कारखान्याकडे असलेल्या कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीतर्फे पावले उचलली जात आहेत. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जोगेश्वरी, रामराई, रामराईवाडी, कमळापूर, नायगाव, बकवालनगर आदी गावांचा समावेश आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यामुळे या परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावात पिण्याचे पाणी, ड्रेनेजलाईन, रस्ते, स्वच्छता आदी नागरी सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत कारखान्यांकडून कर वसुली करते. गावातील नागरिकांना विविध सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीने कारखान्याकडे असलेल्या कर वसुलीसाठी प्रयत्न सुरु केले आहे. या संदर्भात सरपंच सोनू लोहकरे, उपसरपंच मंगल निळ, ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव, सदस्य सूर्यभान काजळे, योगेश दळवी, नजीरखॉ पठाण, सुनील वाघमारे, कल्याण साबळे, कलीम शहा, पंडीत पनाड, छाया बोंबले, लक्ष्मीबाई कडर्लिे, सुमनबाई काजळे, वनिता नरवडे, करुणाबाई सोनकांबळे, अनिता सरोदे, लक्ष्मीबाई चव्हाण आदींनी कारखान्याकडील कर वसुलीचा निर्णय घेतला होता.
७ कोटी कर वसुलीचे उद्दिष्ट
ग्रामपंचायत हद्दीत एकूण १५४ कारखाने असून, चालु अर्थिक वर्षात या कारखान्याकडून जवळपास ७ कोटी रुपयांचा कर वसुलीचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीचे ठेवले आहे. या कारखान्यांकडील थकिम कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीकडून महिनाभरापासून नोटिसा बजावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. १५ मेपर्यंत जवळपास १०० कारखानदारांना ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या आहेत.
...तर कारखान्यावर जप्तीची कारवाई
गतवर्षीचा कर थकविणाºया कारखान्यांची मालमत्ता व यंत्र सामुग्री जप्त करण्याचा इशाराही ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आल्याची माहिती सरपंच सोनु लोहकरे, उपसरपंच मंगलबाई लोहकरे, ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव यांनी दिली. थकीत कारखानदारांनी ग्रामपंचायतीचा कर भरुन जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.