पत्रकार ते आमदारापर्यंतचा प्रवास!

By Admin | Published: October 22, 2014 12:38 AM2014-10-22T00:38:12+5:302014-10-22T01:21:04+5:30

औरंगाबाद : पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना राजकीय मंडळींसोबत अनेकांचा घनिष्ठ संबंध येतो.

Journalist to travel to the legislator! | पत्रकार ते आमदारापर्यंतचा प्रवास!

पत्रकार ते आमदारापर्यंतचा प्रवास!

googlenewsNext

औरंगाबाद : पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना राजकीय मंडळींसोबत अनेकांचा घनिष्ठ संबंध येतो. या संबंधातून अनेकजण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतात; पण यश प्रत्येकाच्या पदरी पडत नाही. तब्बल २२ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ पत्रकार इम्तियाज जलील यांनी अचानकपणे नोकरीला सोडचिठ्ठी देत आपली कर्मभूमी असलेल्या औरंगाबादेतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. अवघ्या एक महिन्यातील त्यांच्या या राजकीय प्रवासात त्यांनी घवघवीत यशही संपादन केले हे विशेष.
इम्तियाज जलील यांचा जन्म औरंगाबादचा. मौलाना आझाद महाविद्यालयात शिक्षण घेतले. शिक्षणानंतर त्यांनी आपले करिअर पत्रकारितेत करण्याचा निर्णय घेतला. ‘लोकमत’टाईम्समध्ये त्यांनी तब्बल १२ वर्षे काम केले. त्यानंतर ‘एनडीटीव्ही’या वृत्त वाहिनीत त्यांनी पुण्यात वरिष्ठ पत्रकार म्हणून काम सुरू केले. या ठिकाणीही १२ वर्षे काम केल्यावर अचानक नोकरीला सोडचिठ्ठी दिली. मागील महिन्यात २० सप्टेंबरला त्यांनी औरंगाबाद गाठले. मित्र परिवाराला त्यांनी सांगितले की, मी औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. विनोदी प्रवृत्ती, हजरजवाबीपणा हे त्यांचे वैशिष्ट्ये राहिल्याने सुरुवातीला मित्रांना वाटले की, हा चेष्टा करीत आहे. त्याने मित्रांना सांगितले की, मी मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लमिनकडून (एमआयएम) निवडणूक लढविणार आहे.
एमआयएम या नवख्या पक्षाची औरंगाबादेत काय डाळ शिजेल, दिग्गज आणि मातब्बर उमेदवारांसमोर आपला काय निभाव लागेल. निवडणुकीसाठी किती कोटी लागतील, असे अनेक अंदाज बांधत मित्रपरिवाराने त्यांना या भानगडीत न पडण्याचा सल्ला दिला. मात्र, इम्तियाज यांचा इरादा आणि मनसुबे अटळ होते. ते इंचभरही मागे हटले नाहीत. २५ सप्टेंबर रोजी त्यांनी एमआयएमकडून उमेदवारी अर्जही दाखल केला. १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले तेव्हा तमाम मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन मतदान केले. १९ रोजी मतपेट्या उघडल्या तेव्हा जनतेने कौल पत्रकार इम्तियाज जलील यांच्या पारड्यात टाकला होता.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी अवघ्या काही दिवसांमध्ये मतदारसंघ प्रचाराच्या निमित्ताने ढवळून काढला. आबालवृद्धांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसादही मिळू लागला. एमआयएमचे प्रमुख अकबर ओवेसी आणि असदोद्दीन ओवेसी यांनी आमखास मैदानावर दोन जाहीर सभा घेऊन इम्तियाज जलील यांच्या विजयावर जणू शिक्कामोर्तबच केले होते.

Web Title: Journalist to travel to the legislator!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.