‘पीएफआय’च्या टार्गेटवर होते न्यायमूर्ती, पोलीस अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 05:36 PM2022-10-05T17:36:55+5:302022-10-05T17:37:20+5:30
संशयित पाच दहशतवाद्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
औरंगाबाद : राज्यातील काही न्यायमूर्ती आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) संघटनेच्या टार्गेटवर होते, असा गौप्यस्फोट दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी (दि. ४) न्यायालयात केला. दरम्यान, अटकेतील ‘पीएफआय’च्या पाचही संशयिताच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात केली.
शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (३७, रा. किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलील (२८, रा. रोजेबाग), परवेज खान मुजम्मील खान (२९, रा. जुना बायजीपुरा), हादी अब्दुल रऊफ (३२, रा. रहेमान गंज, जालना) आणि शेख नासेर शेख साबेर (३७, रा. बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, शहरात आणि जालना येथून पकडलेल्या या आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत ४ ऑक्टोबर रोजी संपल्याने एटीएसच्या अधिकाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्तात त्यांना आज सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. एन. मोरे यांच्यासमोर हजर केले.
यावेळी एटीएसच्या वतीने न्यायालयास सांगण्यात आले की, ‘पीएफआय’च्या या पाचही कार्यकर्त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना त्यांच्या खात्यातून लाखो रुपयांची उलाढाल झालेली दिसते. ते राज्यातील नाशिक, नांदेड, मुंबई येथे पकडलेल्या अन्य संशयितांच्या संपर्कात होते. पडेगाव, नारेगाव आणि जिन्सी आदी ठिकाणी ते युवकांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत. ‘पीएफआय’साठी निधी गोळा केला होता. ‘पीएफआय’च्या टार्गेटवर काही न्यायमूर्ती आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगून त्यांची आणखी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. आरोपींच्या वकिलांनी पोलीस कोठडी देण्यास विरोध दर्शविला. उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी ठोठावत त्यांची रवानगी हर्सूल मध्यवर्ती कारागृहात केली.