न्यायपालिकेचा वेळ खर्ची घातल्याने चौघांना ‘भुर्दंड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 07:15 PM2019-03-02T19:15:32+5:302019-03-02T19:16:01+5:30
‘कॉस्ट’ म्हणून पोलीस कल्याण निधीमध्ये जमा करण्याचा आदेश दिला.
औरंगाबाद : आधी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नंतर उभय पक्षांनी तडजोड केली. त्यानंतर ‘तो’ गुन्हा रद्द करण्यासाठी खंडपीठात धाव घेतली. अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस आणि न्यायपालिकेचा बहुमूल्य वेळ खर्ची घातल्यामुळे औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी चार आरोपींना प्रत्येकी तीन हजारप्रमाणे एकूण बारा हजार रुपये ‘कॉस्ट’ म्हणून पोलीस कल्याण निधीमध्ये जमा करण्याचा आदेश दिला.
खर्डी येथील मुरलीधर पुंजाजी मातकर (७०) यांना आरोपींनी शेताच्या वादातून मारहाण केली होती. त्यांनी यासंदर्भात खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी रामनाथ कोंडिबा मातकर याच्यासह इतर तिघांनी सदर गुन्हा रद्द व्हावा यासाठी खंडपीठात धाव घेतली. आरोपी आणि फिर्यादी यांनी आपसात तडजोड केली आहे. त्यामुळे गुन्हा रद्द करावा, अशी विनंती आरोपींनी केली. सुनावणी अंती खंडपीठाने आरोपींची गुन्हा रद्द करण्याची विनंती मान्य केली. मात्र, तपास यंत्रणा आणि न्यायपालिकेचा वेळ खर्ची घातल्यामुळे चौघा आरोपींना प्रत्येकी तीन हजार याप्रमाणे एकूण १२ हजार रुपये पोलीस कल्याण निधीसाठी दोन आठवड्यांत ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुन्हा रद्द करण्यात आला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संदीप यशवंत महाजन यांनी बाजू मांडली.