निवडणुकीत तोतया अधिकाऱ्यांची उडी; पोलिस सायरनच्या गाड्यात फिरून दारू, जेवणाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 07:38 PM2024-11-07T19:38:11+5:302024-11-07T19:38:28+5:30

निवडणुकीचे काम करतोय, अज्ञातांकडून दादागिरी, पोलिसांचा सायरन वाजवत फिरतात आलिशान गाड्या

Jump of fake officials in elections; Demanding alcohol, food by going around in cars with police sirens | निवडणुकीत तोतया अधिकाऱ्यांची उडी; पोलिस सायरनच्या गाड्यात फिरून दारू, जेवणाची मागणी

निवडणुकीत तोतया अधिकाऱ्यांची उडी; पोलिस सायरनच्या गाड्यात फिरून दारू, जेवणाची मागणी

छत्रपती संभाजीनगर : आम्ही आचारसंहितेचे काम करत आहोत, तपासणी करतोय, असे सांगत आलिशान कारमधून आलेल्या अज्ञातांकडून शासकीय पथकाच्या नावाखाली धाकदपटशा सुरू आहे. मंगळवारी रात्री शरणापूर फाट्याजवळील एका बारमध्ये अशाच एका कारमधील दोघे वाद घालताना सीसीटीव्ही फुटेजध्ये कैद झाल्यानंतर ही घटना समोर आली.

शरणापूर फाट्याजवळ एका हॉटेल व्यावसायिकाने रात्री बार बंद केला होता. कामगार आवराआवर करत होते. तेव्हा १२:३० वाजता पांढऱ्या रंगाची गाडी आली. पोलिस वाहनासारखा सायरन वाजवून हॉटेल चालकाला बाहेर बाेलावले. गाडीतील दोघांपैकी एकाने त्यांना कारमध्ये दारू देण्याचे आदेश दिले. चालकाने बार बंद केल्याचे सांगितले. तेव्हा, ‘आम्ही निवडणुकीचे काम करतोय, एसीबीचे कर्मचारी आहोत’, असे म्हणत दंडेलशाही केली. त्यानंतर त्यांनी काहींना कॉल करून बारचालकावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. बारचालकाने दारू देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर ‘उद्या तुझे हॉटेल बंद करतो’, अशी धमकी देत ते दौलताबादच्या दिशेने रवाना झाले.

कॉल लावून दबाव
पांढऱ्या रंगाच्या कारला असलेल्या एमएच २० फॅन्सी नंबर प्लेटवर पहिला आकडा सूक्ष्म स्वरूपात, तर खाली मोठ्या आकारात ३१३ क्रमांक होता. समोर पोलिस, अशी पाटी लावून पोलिसांच्या वाहनासारखा सायरन देखील ते वाजवत फिरत होते. त्यातील एकाने स्वत:ला लाचलुचपत विभागाचे कर्मचारी असल्याचे सांगत दबाव टाकला. रात्री १० वाजता शहानूरमियाँ दर्गा परिसरात देखील महाराष्ट्र शासन लिहिलेले खासगी वाहन जोरजोरात सायरन वाजवत गेले. केंब्रिज चाैक परिसरातही असे वाहन फिरत असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

तपासणीचा मंडप रिकामा
आचारंसहितेमुळे शहरात ठिकठिकाणी पत्र्यांचे शेड उभारून तपासणीसाठी पथक तैनात केले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह शहराच्या प्रवेश मार्गांवर हे पथक २४ तास तैनात असते. मात्र, पडेगाव, दौलताबाद रस्त्यावर उभारलेले शेड काही दिवसांपासून रिकामेच असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Web Title: Jump of fake officials in elections; Demanding alcohol, food by going around in cars with police sirens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.