पोहता येत नसताना हर्सूल तलावात उडी घेतली; वाचवा वाचवा, आवाज ऐकून सुरक्षा रक्षक धावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 04:51 PM2024-09-16T16:51:19+5:302024-09-16T16:51:19+5:30
बुडणाऱ्या तरुणाला सुरक्षा रक्षकांनी साडीच्या मदतीने बाहेर काढले
छत्रपती संभाजीनगर : हर्सूल तलाव तुडुंब भरत आला आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून अनेक तरुण पोहण्यासाठी येत आहेत. रविवारी दुपारी ३ वाजता एका तरुणाने पोहण्यासाठी तलावात उडी मारली. त्याला पोहता येत नव्हते. त्याने वाचवा वाचवा, अशी ओरड सुरू केली. तेव्हा तलावावर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला साडीच्या साह्याने वाचविले.
हर्सूल तलावाची पाणीपातळी २६ फुटांवर पोहोचली आहे. तलाव भरण्यासाठी आता फक्त दोन फूट पाण्याची गरज आहे. रविवारी दुपारी आकाश चौहान या तरुणाने सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून तलावात उडी घेतली. पोहता येत नसल्याने त्याने ओरड सुरू केली. सुरक्षा रक्षक कैलास वाणी, भालसिंग कणसे, राजेंद्र गवळी, विनोद बनकर आणि जयसिंग हरणे यांनी धाव घेतली. जवळच पडलेल्या एका साडीला दगड बांधून आकाशच्या दिशेने फेकली. आकाशने साडी पडकली. सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढले. भेदरलेल्या आकाशला धीर देत त्याच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांच्या हवाली केले.
आत्महत्येसाठी तलावावर आला तरुण
रविवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आणखी एक तरुण तलावाच्या काठावर बसून रडत होता. आत्महत्या करण्यासाठी तो तलावावर आला होता. सुरक्षा रक्षकांनी त्याच्याजवळ जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्याने प्रांजळपणे कबुली दिली की, मी आत्महत्या करण्यासाठी आलो. सुरक्षा रक्षकांनी त्याची समजूत काढली. तरुणाच्या मेहुण्याला बोलावून त्याच्या हवाली केले. श्रीराम सूर्यभान जाधव, असे या तरुणाचे नाव असून, तो हडको एन-११ भागात राहतो, असे सुरक्षा रक्षकांनी सांगितले.
सुरक्षा रक्षकांना हवे विविध साहित्य
हर्सूल तलावात दरवर्षी आठ ते दहा जण आत्महत्या करतात. काही तरुण पोहताना बुडून मरण पावतात. सुरक्षा रक्षक हे दृश्य पाहूनही अनेकदा काहीच करू शकत नाहीत. या ठिकाणी उत्तम पोहणाऱ्या काही सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे गरजेचे आहे. बुडणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बोट, दोरी आदी साहित्य मनपाने दिले पाहिजे, असे या भागातील नागरिकांनी सांगितले.