समांतरसाठी पाईप खरेदीच्या हालचाली ठप्प
By Admin | Published: October 19, 2014 12:28 AM2014-10-19T00:28:01+5:302014-10-19T00:41:28+5:30
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीसाठी पाईप खरेदीच्या हालचाली सध्या ठप्प आहेत. महापालिकेकडून दरमहा साडेपाच कोटी रुपये कंपनीला दिले जात आहेत,
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीसाठी पाईप खरेदीच्या हालचाली सध्या ठप्प आहेत. महापालिकेकडून दरमहा साडेपाच कोटी रुपये कंपनीला दिले जात आहेत, तर कंपनीने फक्त पाणीपुरवठा आणि पाणीपट्टी वसुलीकडेच लक्ष देण्यावर भर दिला आहे.
समांतर जलवाहिनीसाठी मनपाने पाणीपुरवठा यंत्रणेचे हस्तांतरण करून दीड महिना होत आला आहे. कंपनीकडून याबाबत काहीही माहिती दिली जात नाही, तर पालिका प्रशासनदेखील याबाबत काहीही उत्तर देत नाही.
जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २,००० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. जलवाहिनीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे, असे असताना कंपनी आणि मनपा याबाबत काहीही विचार करताना दिसत नाही.
केंद्र शासनाने १४४ कोटी, राज्य शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मनपाला दिला आहे. त्यावर ७० कोटी रुपयांचे व्याज जमा झाले आहे. समांतर जलवाहिनीच्या कामासाठी दर गुरुवारी समन्वय समितीची बैठक घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, सहा आठवड्यांत फक्त एक बैठक झाली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे समन्वय समितीची बैठक झाली नाही. त्यामुळे योजनेच्या कामात नेमके काय सुरू आहे, हे कुणीही सांगण्यास तयार नाही.
समांतर जलवाहिनीचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून येणाऱ्या तीन वर्षांत योजना पूर्ण होईल किंवा नाही याबाबत महापालिकेच्या वर्तुळात साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.