हजार रुपये लाच घेताना वित्त विभागाचा कनिष्ठ सहाय्यक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:04 AM2020-12-25T04:04:36+5:302020-12-25T04:04:36+5:30
रामू सोनाजी दाभाडे (३८) असे लाचखोर कनिष्ठ सहायकाचे नाव आहे. तक्रारदार हे वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत ...
रामू सोनाजी दाभाडे (३८) असे लाचखोर कनिष्ठ सहायकाचे नाव आहे.
तक्रारदार हे वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. जिल्हा परिषद वित्त विभागातर्फे शिक्षकांच्या वेतन पडताळणी करीता २१ ते २४ डिसेंबरदरम्यान वैजापूर पंचायत समितीच्या लेखा विभागात शिबिर भरविण्यात आले होते. त्यावेळी तक्रारदार शिक्षकाला वेतन पडताळणीचे काम कनिष्ठ सहायक रामू दाभाडे यांच्याकडे असल्याचे समजले. यामुळे त्यांनी दाभाडेशी संपर्क साधला असता दाभाडेने वेतन पडताळणीचा अहवाल देण्यासाठी तक्रारदार शिक्षकाकडे एक हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालयाकडे तक्रार नोंदविली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधकच्या पोलीस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी, जमादार भीमराज जिवडे, प्रकाश घुगरे, विलास चव्हाण आणि चांगदेव बागुल यांनी सापळा रचून गुरुवारी दाभाडे याला हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.