वरूड काजी गावातील पाच पिंडी असणारे जुन्नेश्वर मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:08 AM2018-02-13T00:08:15+5:302018-02-13T00:08:24+5:30
सामान्यत: मंदिरांमध्ये महादेवाच्या एक किंवा दोन पिंडी पाहायला मिळतात; पण एकाच मंदिरात महादेवाच्या पाच पिंडी असणे ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. औरंगाबाद शहरापासून पूर्वेकडे अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील वरूड काजी गावातील प्राचीन जुन्नेश्वर मंदिरात महादेवाच्या पाच पिंडी आहेत. श्री क्षेत्र जुने ईश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे तीर्थस्थळ आज पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंद्रा/वरुडकाजी : सामान्यत: मंदिरांमध्ये महादेवाच्या एक किंवा दोन पिंडी पाहायला मिळतात; पण एकाच मंदिरात महादेवाच्या पाच पिंडी असणे ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. औरंगाबाद शहरापासून पूर्वेकडे अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील वरूड काजी गावातील प्राचीन जुन्नेश्वर मंदिरात महादेवाच्या पाच पिंडी आहेत. श्री क्षेत्र जुने ईश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे तीर्थस्थळ आज पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे दहा बाय दहाच्या कुंडात एकाच ठिकाणी एकाच दगडावर महादेवाच्या पाच स्वयंभू पिंडी. या पिंडींसोबतच पार्वती, नंदी व कासवही विराजमान आहेत. या मंदिराविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की, प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले होते, तेव्हा पंचवटीकडे जाताना पाच दिवस ते वरूड काजी येथे मुक्कामी थांबले होते. तेव्हा श्रीरामांनी पूजेसाठी दररोज महादेवाची एक पिंड घडवली. त्यामुळे येथे पाच पिंडी निर्माण झाल्या. विशेष म्हणजे ज्या कुंडात या पिंडी आहेत, त्या कुंडात पावसाळ्यात पूर्वेकडून खालच्या बाजूने पाणी येते, त्यामुळे चार फुटांचे हे कुंड पावसाळ्यात पाण्याने पूर्णपणे भरून जाते. यावेळी महादेवाच्या पिंडीही पाण्याखाली जातात. फार पूर्वी या गावातील गुराखी ओढ्याच्या मार्गाने गुरे चारण्यासाठी घेऊन जात असत. असेच एक दा गुरे चरत असताना गायीचे खुर जमिनीत रुतून खड्डा पडला आणि त्यातून पाणी येऊ लागले. हे पाहून आश्चर्यचकित होऊन गुराख्यांनी थोडा खड्डा केला. गावकºयांना ही गोष्ट समजली. त्यांनी त्या ठिकाणी झिरा खोदला असता महादेवाची पिंड दिसली. मग आणखी खोदकाम केले असता कुंड, महादेवाच्या पाच पिंडी आणि इतर मूर्तींचा शोध लागला.
यापैकी मोठी पिंड साडेचार फुटांची असून, दोन पिंडी सव्वादोन फुटांच्या तर दोन पिंडी दीड फुटाच्या आहेत. पार्वतीची मूर्ती एक फु टाची, तर नंदीची मूर्ती सव्वाफुटी असून या सर्व मूर्ती एकाच दगडातून घडविण्यात आल्या आहेत. आता गावकºयांनी या कुं डाशेजारी सभामंडप बांधला असून, प्रतिवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावेळी आजूबाजूच्या गावातील अनेक भाविक मोठ्या भक्तिभावाने मंदिरात दाखल होतात. महाशिवरात्रीचे औचित्य साधून परिसरात कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात येतो. जिंकणाºया पहिलवानांना मोठे इनाम दिले जातात. महाशिवरात्रीला पहाटे चार वाजेपासूनच अभिषेकाला सुरुवात होते. यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होऊन सायंकाळी ७ वा. महादेवाची महाआरती होते. महाशिवरात्रीचा उत्सव गावकºयांमध्ये भक्ती आणि उत्साहाचे उधाण घेऊन येणारा ठरतो.
गावकºयांची खंत
या महादेव मंदिराला २०१३ साली राज्य शासनाने तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा दिला आहे. मात्र, अजूनही मंदिराचा फारसा विकास झाला नसल्याची खंत गावकºयांनी व्यक्त केली.
महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम
महाशिवरात्रीनिमित्त गुलमंडी परिसरातील भोलेश्वर मंदिर येथे मंदिराचे पुजारी पार्वती महादप्पा भुरेवार यांच्यातर्फे मंदिरातील महादेवास चांदीचा मुखवटा बसविण्यात येणार आहे. नगरसेवक सचिन खैरे, हरीश बोंबले हे कार्यक्रमाचे यजमान असतील. दु. २ ते ३: ३० पर्यंत महादेवाची शोभायात्रा व नगर प्रदक्षिणा काढण्यात येईल. दु. ४ ते सायं. ६ यावेळेत महाअभिषेक तर सायं. ६: ३० वा. महाआरती होईल. यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले.