बौद्ध होण्याचे नुसतेच सोंगढोंग
By Admin | Published: September 11, 2016 01:04 AM2016-09-11T01:04:50+5:302016-09-11T01:22:51+5:30
औरंगाबाद : बौद्ध होणे ही साधी गोष्ट नाही. लोकांनी इथे गाड्या आणि घरांना त्यावर नाव लिहून बौद्ध बनविले; पण घरातील माणसं मात्र बौद्ध झाली नाहीत.
औरंगाबाद : बौद्ध होणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी सदाचारी बनावे लागते. वाईट गोष्टीचा त्याग करावा लागतो. लोकांनी इथे गाड्या आणि घरांना त्यावर नाव लिहून बौद्ध बनविले; पण घरातील माणसं मात्र बौद्ध झाली नाहीत. आम्ही बौद्ध असल्याची नुसती सोंगढोंगच करीत आहोत, अशी खंत भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी व्यक्त केली.
अनिलकुमार सोनकामळे लिखित ‘दलित नही, बौद्ध कहो’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन शनिवारी भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे अशोक कांबळे होते. व्यासपीठावर प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. अरविंद गायकवाड, प्रसिद्ध कवी प्रतापसिंग बोदडे, बौद्ध महासभेचे अॅड. एस. आर. बोदडे, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती रतनकुमार पंडागळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विशुद्धानंद बोधी म्हणाले, गेल्या ३६ वर्षांपासून मी बौद्ध बनविण्याच्या प्रक्रियेत स्वत:ला वाहून घेतले आहे. तरीही इथल्या लोकांना मी अजून बौद्ध बनवू शकलो नाही ही माझ्यासाठी शोकांतिका आहे. इथे लोकांनी गाड्या, घरांना बौद्ध बनविले. घरांना सम्यक नाव दिले; पण स्वत: बुद्धाचे आचरण केलेले नाही. आम्ही नुसते सोंगढोंग करतो आहोत. गाडीवर बौद्ध असल्याचे लिहितो, पण त्याच गाडीवर बसून जाताना जर एखाद्याने ओव्हरटेक केले तर लगेच त्याला शिवी हासडतो. मग आम्ही बौद्ध कसे. आम्ही स्वत:ला बुद्धाचे, आंबेडकरांचे अनुयायी म्हणतो आणि दुसरीकडे खा, प्या, मजा करा अशा पद्धतीने जगतो आहोत. जयभीम बोलो आणि कही भी चलो असे आमचे वागणे सुरू आहे. हे बदलले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
तत्पूर्वी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दलित नही बौद्ध कहो या पुस्तकावर भाष्य केले. दलित ही त्याज्य असलेली ओळख झुगारून बौद्ध अशी नवीन ओळख करून देण्याचा महत्त्वाचा मुद्दा या पुस्तकात मांडला आहे. परंतु केवळ अशी ओळख करून देऊन चालणार नाही तर ते करताना बौद्ध बनविण्याची प्रक्रिया आणखी एक पाऊल पुढे आली पाहिजे. बौद्ध समाज परिवर्तनाच्या चळवळीत वेगाने पुढे जात आहे, असेही डॉ. गायकवाड म्हणाले. यावेळी प्रतापसिंग बोदडे यांनी आपण आपल्या लेखनात यापुढे दलित हा शब्द वापरणार नसल्याचे स्पष्ट केले. सुरुवातीला लेखक अनिलकुमार सोनकामळे यांनी दलित हा शब्द असंवैधानिक असून तो बाबासाहेबांनाही पसंत नव्हता. हा शब्द त्याज्य किंवा कमी लेखणारा आहे. त्यामुळे मागासवर्गीयांनी यापुढे दलित अशी ओळख करून देऊ नये, असे आवाहन केले.