‘सुपर स्पेशालिटी’ची फक्त स्वप्ने; अँजिओग्राफी-अँजिओप्लास्टी सुरू होईना, डाॅक्टरांची प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 08:09 PM2022-07-06T20:09:47+5:302022-07-06T20:10:59+5:30

२ वर्षांपासून इमारतीत कोट्यवधींची यंत्रसामग्री पडून आहे.

Just dreams of a ‘super specialty’; Angiography-angioplasty did not start, just waiting for the doctor | ‘सुपर स्पेशालिटी’ची फक्त स्वप्ने; अँजिओग्राफी-अँजिओप्लास्टी सुरू होईना, डाॅक्टरांची प्रतीक्षाच

‘सुपर स्पेशालिटी’ची फक्त स्वप्ने; अँजिओग्राफी-अँजिओप्लास्टी सुरू होईना, डाॅक्टरांची प्रतीक्षाच

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
औरंगाबादेत केंद्र आणि राज्य सरकारच्या १५० कोटी रुपयांच्या निधीतून घाटी रुग्णालयात सुपर स्पेशालिटी ब्लाॅक उभारण्यात आले. कोट्यवधींची यंत्रसामग्रीही दाखल झाली. मात्र, या भव्य दिव्य इमारतीत साधी अँजिओग्राफी, ॲँजिओप्लास्टीदेखील सुरु होऊ शकलेली नाही; सुपर स्पेशालिटी उपचार मिळणे तर दूरच. त्यासाठी रुग्णांना खाजगी रुग्णालयाचाच रस्ता धरावा लागत आहे.

घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लाॅकमध्ये कार्डियोलाॅजी (हृदयरोग), उरोशल्यचिकित्सा, युरोलाॅजी (मूत्रविकार), युरोसर्जरी (मुत्रशल्यचिकित्सा), न्यूराॅलाॅजी (मज्जातंतू), न्यूराेसर्जरी (मज्जातंतू शल्य चिकित्सा), निओनॅटाॅलाॅजी (नवजात शिशू )आणि प्लास्टिक सर्जरी हे ८ सुपर स्पेशालिटी उपचार देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. २ वर्षांपासून इमारतीत कोट्यवधींची यंत्रसामग्री पडून आहे. मार्चमध्ये ॲँजिओग्राफी, ॲँजिओप्लास्टीसाठी साहित्याची मागणी करण्यात आली. परंतु अजूनही ती मिळालेली नाही. येथे काही दिवसांपूर्वीच ‘पीपीपी’च्या माध्यमातून उपचार, सोयीसुविधा देण्याची चाचपणी करण्यात आली.

२१९ पदे मंजूर, पण...
अकोला, यवतमाळ, लातूर आणि औरंगाबादेतील सुपर स्पेशालिटी ब्लाॅकसाठी पहिल्या टप्प्यात ८ जानेवारी २०२१ रोजी ८८८ पदांच्या निर्मितीला मंजुरी मिळाली. औरंगाबादसाठी २१९ पदे मंजूर झाली. मूत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागात एक प्राध्यापक, निओनॅटाॅलाॅजी विभागात करार पद्धतीवर एक सहयोगी प्राध्यापक रुजू झाले. उरोशल्यचिकित्साशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापकांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. ‘एमपीएससी’तर्फे निवड झालेल्या काहींनी रुजू होण्यास नकार दिला. सहायक, सहयोगी आणि प्राध्यापक आणि वर्ग-३, वर्ग-४ च्या पदभरतीची प्रतीक्षाच आहे.

इमारतीत सध्या काय?
सुपर स्पेशालिटीच्या इमारतीत सध्या एमआरआय, डायलसिसची सुविधा सुरु आहे. त्याबरोबरच न्यूरोलाॅजी आणि काार्डिओलाॅजी विभागाची केवळ ओपीडी सुरु आहे.

प्रयत्न सुरु
अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच याबाबत ‘ओएसडी’ यांना पत्र देणार आहे. पदभरतीची प्रक्रियाही सुरु आहे.
- डाॅ. वर्षा रोटे-कागीनाळकर, अधिष्ठाता, घाटी

शासन स्तरावर प्रक्रिया
अध्यापकांची पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. प्राध्यापक, सहायक आणि सहयोगी प्राध्यापक संवर्गातील पदे भरून देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आलेला आहे.
- डाॅ. सुधीर चौधरी, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी ब्लाॅक

Web Title: Just dreams of a ‘super specialty’; Angiography-angioplasty did not start, just waiting for the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.