गुंठेवारीवरच नजर; पण सुविधांअभावी पेशवेनगरवासीय बेजार
By साहेबराव हिवराळे | Published: September 1, 2023 08:46 PM2023-09-01T20:46:05+5:302023-09-01T20:46:36+5:30
ड्रेनेजलाइनच्या दुर्गंधीने त्रस्त, बोअरवेलने पावसाळ्यातच तळ गाठला
छत्रपती संभाजीनगर : मनपा प्रशासन फक्त गुंठेवारी वसुलीवर नजर ठेवते; पण सुविधा पुरविणार कधी, असा सवाल पेशवेनगरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
यंदा पावसाने दडी मारल्याने पावसाळ्यात बोअरवेलने तळ गाठल्याने टँकर व जारच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. प्रमुख रस्ते सिमेंटीकरणाने बांधण्यात आले. परंतु अंतर्गत रस्त्यांची आजही दुर्दशा आहे. पावसाळ्यात चिखल तुडवतच रहिवाशांना घर गाठावे लागते. मनपाने मंजूर केलेली कामे मनपाने मार्गी लावावीत, असे माजी नगरसेविका सायली जमादार यांनी सांगितले.
हेतूपुरस्सर दुर्लक्ष
अंतर्गत रस्त्याच्या सिमेंटीकरणाचा विषय लांबणीवर पडलेला दिसत आहे. गुंठेवारी तसेच कर वसुलीकडे मनपाचे ज्याप्रमाणे लक्ष केंद्रित आहे. त्याचप्रमाणे सुविधा देण्याकडेही लक्ष ठेवले पाहिजे.
- राहुल शिरसाट
कर वसुलीत पुढे; परिसर सुविधांचे काय?
अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने वास्तव्यास असल्याने त्यांना घराचा कर भरावाच लागतो. परंतु वाहनावाचून काम अडते तरी खासगी मजुराकडून ड्रेनेजची दुरुस्ती करून घ्यावी लागते. मनपाच्या स्वच्छता करणाऱ्या वाहनासह कर्मचारी येण्यास टाळाटाळ करतात. साताऱ्यातून कार्यालय आता रेल्वे स्टेशन परिसरात गेल्याने तेथे जावे लागते. या अडचणीमुळे नागरिकांना खासगी कर्मचाऱ्याकडून कामे करून घ्यावी लागतात.
- हनुमान कदम
कुंपण लावणे गरजेचे
धोकादायक ट्रान्सफाॅर्मर उघडेच ट्रान्सफाॅर्मरला असलेले संरक्षण कुंपण तुटले असून, बाजूलाच शाळा आहेत. मुलांची ये-जा सुरू असते. रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रान्सफाॅर्मरला कुंपण उभारून सुरक्षितता द्यावी. मोकाट जनावरे कुणाची आहेत, हे कळत नाही. परंतु अपघाताचे प्रकार घडतात. त्यासाठी कुंपण लावणे गरजेचे आहे.
- प्रवीण मोहिते
जलवाहिनी टाकली; पाणी कधी?
सातारा परिसरात टाकण्यात आलेल्या जलवाहिनीला पाणी येणार कधी, असा सवाल रहिवाशांतून उपस्थित होत आहे. सध्या टँकरच्या फेऱ्या वाढल्याने नागरिकांच्या खिशावर भार पडतो आहे.