तीन दिवसांत केवळ सात अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:47 AM2017-09-20T00:47:28+5:302017-09-20T00:47:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेवर पितृपक्षाचा मोठा परिणाम जाणवत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेवर पितृपक्षाचा मोठा परिणाम जाणवत असून तीन दिवसांत केवळ ७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या २० प्रभागांतर्गत ८१ वॉर्डासाठी ११ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. शनिवारपासून या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहेत. मनपा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच आॅनलाईन प्रक्रियेचा वापर केला जात आहे. पहिल्या दिवशी प्रभाग १३ ब एकमेव अर्ज आला होता. त्यानंतर रविवारी सुटीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले नाहीत. सोमवारी प्रभाग ११ क मध्ये शाहिस्ता तनवीर म. जावेद, प्रभाग १३ क मध्ये पठाण जिनत खान जफर अली खान आणि प्रभाग १३ ड मध्ये पठाण जफर अली म. अली खान आणि पठाण म. नवीन खान जफर अली खान या चार उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. मंगळवारी तिसºया दिवशी केवळ दोन उमेदवारी अर्ज मनपा निवडणुकीत प्राप्त झाले आहेत. प्रभाग ८ ड मध्ये प्रकाश देवीदास रोकडे आणि १२ ड मध्ये शाख अन्वर खुरेशी शे. खासीम कुरे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराकडून मुहूर्त शोधला जात आहे. सध्या पितृपक्ष सुरू असल्याने या कालावधीत बहुतांश उमेदवारांनी उमेदवारी दाखल करण्याचे टाळलेच आहे. २० सप्टेंबर रोजी पितृपक्ष संपणार आहे. त्यानंतर उर्वरित तीन दिवसांत उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी गर्दी होणार आहे. त्यात शेवटच्या दिवशी दमछाक होण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मात्र भरले जात आहेत. शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या ८, ९, १० या प्रभागासाठी आतापर्यंत ३५ उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. उमेदवारांना २४ तास आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. या आॅनलाईन अर्जाची प्रत भरण्यासाठी उमेदवारांनी निवडणूक कार्यालयात यावे लागत आहे. तो अर्ज सादर केल्यानंतरच उमेदवारांची उमेदवारी ग्राह्य धरली जाणार आहे. शेवटच्या दिवसांत गर्दी टाळण्यासाठी वेळीच अर्ज दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले़