अवघ्या तीन मिनिटांची दहशत... चार जणांवर पिस्तूल रोखून लुटले १ लाख २६ हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:02 AM2021-08-13T04:02:27+5:302021-08-13T04:02:27+5:30
माळीवाडा येथील हर्ष पेट्रोल पंपावरील थरार : ५० पेक्षा अधिक नागरिक बघत राहिले औरंगाबाद : पल्सर गाडीवर दोघे येतात. ...
माळीवाडा येथील हर्ष पेट्रोल पंपावरील थरार : ५० पेक्षा अधिक नागरिक बघत राहिले
औरंगाबाद : पल्सर गाडीवर दोघे येतात. पंपाच्या बाजूलाच मध्यभागी दुचाकी उभी करतात. पंपाच्या कॅबिनकडे शांतपणे चालत जात दरवाजात पोहोचतात आणि अचानक खिशातून पिस्तूल काढतात. तेथे चार कर्मचारी मोजत असलेले १ लाख २६ हजार रुपये बॅगमध्ये भरतात. ही रक्कम घेऊन शांतपणे दुचाकीपर्यंत जाऊन, दुचाकीवरून पेट्रोल पंपाला वळसा घालून औरंगाबादच्या दिशेने पोबारा केला. चित्रपटात शोभावी अशी लुटीची घटना औरंगाबाद-नाशिक रोडवरील माळीवाडा येथील हर्ष पेट्रोल पंपावर गुरुवारी (दि. १२) सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांनी घडली. केवळ तीन मिनिटांच्या दहशतीने पंपावर पेट्रोल भरण्यासाठी उभ्या ५०हून अधिक लोकांना गप्पगार पुतळे केले. भीतीपोटी एक जणही आपल्या जागेवरून इंचभर हलला नाही.
औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील शहरापासून १५ किमी अंतरावरील माळीवाडा गावालालागून आशिष वसंतराव काळे यांच्या मालकीचा हर्ष पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर नेहमीच गर्दी असते. गुरुवारी सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांनी तेथे २५ पेक्षा अधिक मोटारसायकस्वार पेट्रोलसाठी रांगेत उभे होते. त्याचवेळी एका पल्सर गाडीवर दोघे आले. त्यांच्या तोंडाला रुमाल बांधलेले, पाठीवर बॅग होती. पंपावर गाडी मध्यभागी पार्क करीत ते थेट पैसे मोजत असलेल्या पंपाच्या कार्यालयाकडे शांतपणे चालत गेले. आतमध्ये पंपाचे व्यवस्थापक शंकर संजय घोगरे (२१, रा. रांजणगाव, ता. फुलंब्री), सेल्समन भगवान प्रकाश बोगांने, सोमनाथ सुखदेव दौड आणि तात्याराव निवृत्ती शेळके हे गेल्या २४ तासांत झालेल्या पेट्रोल विक्रीतून जमलेले पैसे मोजत बसले होते. त्यांनी ५००, २००, १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटा वेगवेगळ्या केल्या होत्या. आलेल्या दोघांपैकी एकाने ‘यहाँ पे एअरटेल मनी होगा क्या?’ असे विचारले. त्यावर येथे पेटीएमद्वारे व्यवहार होऊ शकतो, असे मॅनेजरने सांगितले. तेवढ्यात त्याने खिशातून पिस्तूल बाहेर काढून त्यांच्यावर रोखून धरले. दुसऱ्या सहकाऱ्याने धारदार गुप्ती काढली. त्याने ‘कॅश निकालो और हमारे बॅग मे डालो’ असे बजावले. घाबरलेल्या चारही कर्मचाऱ्यांनी हात जोडले. पैसे उचलताना एका कर्मचाऱ्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तूल त्याच्या कानशिलाजवळ लावल्यानंतर त्याने कोपऱ्यात उडी घेत शांत बसला. कार्यालयातील हा सर्व लुटीचा प्रकार केवळ ४० सेकंदात झटपट झाला. पैसे बॅगेमध्ये भरून लुटारू ऐटीत बाहेर येत शांतपणे मोटारसायकलवर बसून औरंगाबादच्या दिशेने पेट्रोल पंपावरून निघून गेले.
ही माहिती समजताच पंपमालक आशिष काळे, दिलीप चव्हाण आदींनी धाव घेतली. शंकर घोगरे यांच्या तक्रारीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
चौकट,
घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद
ही लूट करण्यापूर्वी आरोपी गुंडांनी काही वेळ पंपावर येऊन रेकी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. पहिल्या वेळेस येताना त्यांनी तोंडाला काहीही बांधलेले नव्हते. चोरी करण्यासाठी आले तेव्हा त्यांनी तोंडाला बांधलेले होते. त्यांनी पैसे घेतल्यानंतर दिशाभूल करण्यासाठी औरंगाबादच्या दिशेने जात असल्याचे भासविले. मात्र, ते वाळूजच्या दिशेने जात लिंबेजळगाव येथील टोलनाक्याच्या सीसीटीव्हीतही कैद झाले आहेत. त्यांनी हा टोलनाका ११ वाजेच्या सुमारास क्रॉस करीत नगरच्या दिशेने पळ काढला.
चौकट,
गुन्हेगारांना पकडण्यासाठी २२ पथके तैनात
या घटनेनंतर या लुटारूंना पकडण्यासाठी पोलिसांची २२ पथके तैनात करण्यात आली. यातील ११ पथके ते कसे आले आणि ११ पथके ते कसे गेले याचा तपास करीत आहेत. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, दौलताबाद ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, मनोज शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांच्या सूचनांनुसार तपासाची चक्रे फिरविण्यात आली आहेत.