फक्त गाडी हळू चालवण्यास सांगितले, गुंडांनी तरुणाची घरासमोरच केली निर्घृण हत्या
By सुमित डोळे | Published: June 22, 2024 03:07 PM2024-06-22T15:07:09+5:302024-06-22T15:09:49+5:30
छत्रपती संभाजीनगर मध्ये गुंडगिरी डोईजड, समोर कृत्य घडत असताना नागरिक हत्या बघण्यात मग्न
छत्रपती संभाजीनगर : गाडीचा धक्का लागल्याने आक्षेप घेऊन गाडी हळू चालवण्याचा सल्ला दिलेल्या निष्पाप १८ वर्षीय तरुणाची दुचाकीवरील गुंडांनी निर्घृणपणे हत्या केली. अमान सय्यद असद (१८) असे मृत मुलाचे नाव आहे. हर्सुलच्या जहांगिर कॉलनीत शुक्रवारी रात्री १२ वाजता ही घटना घडली. गुंडांकडून खुलेआम शस्त्राने होत असलेले हल्ले, हत्यांच्या प्रकारामुळे छत्रपती संभाजीनगर पाेलिसांचा धाक संपल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
अमान जहांगिर कॉलनीत कुटूंबासह राहत होता. त्याचे वडिल सय्यद असद सय्यद रशीद यांचा भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. २१ जून रोजी अमान मित्र अरबाज शेख याच्यासह घराच्या परिसरातील एका किराणा दुकानासमोर उभा होता. तेथून अरुंद रस्त्यावर शेख शारेक शेख अन्वर व शेख पप्पू शेख अजिज हे दोन टवाळखोर सुसाट दुचाकी पळवत होते. अमानला त्यांच्या दुचाकीचा जोराचा धक्का लागला. त्यामुळे अमानने त्यांना 'गाडी हळू चालवता येत नाही का' असे विचारुन सुनावले. त्यावरुन त्यांच्यात शिविगाळ झाली. काही वेळाने दोन्ही गुंडांनी अमानच्या घराबाहेर जाऊन त्याला बाहेर बोलावले. थेट लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
बरगड्यापर्यंत चाकु खुपसला
शारेकने मारहाण करत असतानाच अचानक खिशातून चाकू काढून अमानच्या छातीत खुपसला. शेकडो नागरिकांच्यासमोर हे कृत्य घडत होते. चाकुच्या हल्ल्यात अमान रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला. मारेकऱ्यांनी त्याच्या आई वडिलांना देखील बेदम मारहाण केली. त्यानंतर अमानला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हर्सुल पोलिसांनी यातील एका संशयिताला ताब्यात घेतले होते. तर दुसरा मात्र पसार झाला होता.