मदतीची प्रतीक्षाच; नुकसान भरपाईपासून १७ लाख शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 02:35 PM2020-12-18T14:35:11+5:302020-12-18T14:37:31+5:30
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा आहे.
औरंगाबाद : अतिवृष्टीत झालेल्या नुकसान भरपाईपासून मराठवाड्यातील १७ लाख शेतकरी वंचित आहेत. पहिल्या टप्प्यात आलेले १३३६ कोटींचे अनुदान २१ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान एनडीआरएफच्या पाहणीनंतर मिळण्याची शक्यता आहे. १७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यानंतरच मदत जमा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील अनुदान वाटप नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाले. त्यातील काही अनुदान अजून वाटप झालेले नाही. बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच अनुदान वाटप करु अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र विभागात १ हजार ३३६ कोटी ८९ लाख २३ हजार रुपयांचा पहिला हप्ता सरकारने दिला. विभागातील ३७ लाख ९५ हजार शेतकरी अनुदानाची वाट पाहत आहेत. रबी हंगामातील पेरण्या सुरु झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील १३३६ कोटी रुपयांचे अनुदान सुमारे २१ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात आले, म्हणजे अद्यापही तब्बल १७ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अनुदान गेलेले नाही. जून ते सप्टेंबर तसेच ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला.
शेतीव्यतिरिक्त इतर नुकसान
सरत्या वर्षात झालेल्या अतिवृष्टीने ६७ नागरिकांचा आणि ८०० लहान-मोठ्या जनावरांचा बळी घेतला आहे. अतिवृष्टीने शेतीमालाचे नुकसान केलेच शिवाय जीवितहानी देखील केली. विभागातील औरंगाबादमधील १५, जालना १४, परभणी ५, हिंगोली २, नांदेड ११, बीड ८, लातूर ९ तर उस्मानाबादमधील ३ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. ४२० मोठे दुधाळ जनावरे अतिवृष्टीत दगावली. लहान १०१ तर ओढकाम करणारे २३८ जनावरे मृत्युमुखी पडली. २ हजार ३० कुटुंबांचा संसार अतिवृष्टीमध्ये वाहून गेला. ४ हजार ३१८ कच्च्या घरांचेही नुकसान झाले आहे. तर १९६ पक्क्या घरांची पडझड झाली आहे. जनावरांचे १५३ गोठे नष्ट झाले.