प्रभारी महापौरपदी कैलास कांबळे
By Admin | Published: May 3, 2016 12:00 AM2016-05-03T00:00:32+5:302016-05-03T00:05:03+5:30
लातूर : महापौर अख्तर शेख यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे महापौर व नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे़ परिणामी,
नव्या महापौरांची निवड होईपर्यंत राहणार पदभार
लातूर : महापौर अख्तर शेख यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे महापौर व नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे़ परिणामी, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या महापौरपदी काँग्रेस पक्षाने प्रभारी महापौर म्हणून उपमहापौर कैलास कांबळे यांची निवड केली आहे़ नव्या महापौरांची निवड होईपर्यंत महापौर पदाचा पदभार त्यांच्याकडे राहणार आहे़
विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २१ एप्रिल रोजी महापौर अख्तर शेख यांचे ‘मिस्त्री’ या जातीचा जाती दावा अमान्य करून जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविले होते़ जात पडताळणी समितीच्या या निर्णया विरुद्ध अख्तर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती़ मात्र न्यायालयाने २८ एप्रिल रोजी विभागीय जात पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवला आहे़ त्यामुळे अख्तर शेख यांचे नगरसेवक व महापौरपद रद्द झाल्याचे न्यायालयाच्या आदेशात नमुद आहे़ न्यायालयाच्या आदेशानुसार अख्तर शेख यांनी आपल्या महापौर पदाचा राजीनामा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांच्याकडे सादर केला होता़
महापौर शेख यांचा राजीनामा पक्षाकडे येताच तो मंजूर करून मनपा आयुक्तांकडे कारवाईसाठी सादर केला आहे़ आयुक्तांनी सदर राजीनामा विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे़ दरम्यान, महापौरपदाचा अतिरीक्त कारभार उपमहापौर कैलास कांबळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला असून, नव्याने महापौरांची निवड होईपर्यंत हा पदभार उपमहापौर कैलास कांबळे यांच्याकडे राहणार आहे़ दरम्यान, प्रभारी महापौरपदी निवड होताच कैलास कांबळे यांनी माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री आ़दिलीपराव देशमुख यांची सोमवारी भेट घेतली़ यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, रेणा कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील, नगरसेवक राजकुमार जाधव, पृथ्वीराज सिरसाठ, सुपर्ण जगताप, दिलीप माने, युनुस मोमिन, अल्ताफ शेख यांची उपस्थिती होती़
महापौर निवडीकडे लक्ष़़़
प्रभारी महापौरपदाचा पदभार उपमहापौर कैलास कांबळे यांच्याकडे सोपविला असला तरी महापौरपदाच्या निवडीकडे लक्ष लागले आहे़ १० महिन्याचा कार्यकाळ मिळणार असल्याने अनेकजण या पदावर आपली वर्णी लागण्यासाठी श्रेष्ठींकडे प्रयत्न करीत आहेत़ सध्या मनपाच्या राजकीय वर्तुळात महापौर पदासाठी चार - पाच जणांच्या नावाची चर्चा असून, त्यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडेल याची उत्सुकता आहे़ विद्यमान परिवहन सभापती विक्रांत गोजमगुंडे, स्थायीचे माजी सभापती राम कोंबडे, अॅड़दीपक सुळ, असगर पटेल, महादेव बरुरे ही नावे चर्चेत आहेत़