काकाला पुतण्या भारी....!

By Admin | Published: January 17, 2017 10:43 PM2017-01-17T22:43:20+5:302017-01-17T22:44:04+5:30

बीड : येथील पालिकेत मंगळवारी पार पडलेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काकू-नाना आघाडीचे हेमंत क्षीरसागर यांनी २७ विरुद्ध १९ अशा आठ मतांच्या फरकाने विजय संपादन केला

Kaka's neonatal heavy ....! | काकाला पुतण्या भारी....!

काकाला पुतण्या भारी....!

googlenewsNext

बीड : येथील पालिकेत मंगळवारी पार पडलेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काकू-नाना आघाडीचे हेमंत क्षीरसागर यांनी २७ विरुद्ध १९ अशा आठ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय द्वंद्वामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष याकडे वेधले होते. पाच जणांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळाली. राष्ट्रवादी व काकू - नाना आघाडीच्या प्रत्येकी दोन व एमआयएमच्या एका सदस्याने या माध्यमातून सभागृहात प्रवेश केला. नगराध्यक्षपद राकाँकडे व उपनगराध्यक्षपद आघाडीकडे असल्याने भविष्यातही काका- पुतण्यातील शह-काटशहाचे राजकारण रंगणार आहे.
सकाळी १० वाजेपासूनच पालिकेसमोरील शिवाजी महाराज पुतळा ते बशीरगंज चौक रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेटस् लावून वाहतूक वळविली होती. त्यानंतर गटागटाने नगरसेवक पालिकेत दाखल झाले. दुपारी बरोबर बाराच्या ठोक्याला सभागृहाचे कामकाज सुरु झाले. पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर तर सचिव म्हणून मुख्याधिकारी प्रशांत खांडकेकर यांनी काम पाहिले. बैठकीच्या सुरुवातीला कामकाजाची रुपरेषा व सर्वसाधारण सभेची पार्श्वभूमी सांगण्यात आली. सुरुवातीला उपनगराध्यक्ष निवड झाली. याकरता तिघांचे सात अर्ज प्राप्त झाले होते. ते काकू - नाना विकास आघाडीतर्फे हेमंत क्षीरसागर तर राष्ट्रवादीच्या पुढाकारातून दोन अपक्ष नगरसेवकांना सोबत घेऊन स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीतर्फे विनोद मुळूक, भास्कर जाधव यांचे अर्ज आले होते. यापैकी जाधव यांनी माघार घेतली. हात उंचावून मतदान घेण्यात आले. हेमंत क्षीरसागर यांना २७ तर विनोद मुळूक यांना १९ मते मिळाली. हेमंत यांनी आठ मतांनी मुळूक यांचा पराभव केला.
त्यानंतर स्वीकृत सदस्य निवडीची प्रकिया झाली. याकरता १३ जणांचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. यापैकी पाच जणांची निवड करण्यात आली. बीड शहर विकास आघाडीतर्फे (राष्ट्रवादी पुरस्कृत) डॉ. योगेश क्षीरसागर, शुभम धूत, काकू- नाना विकास आघाडीकडून माजी नगरसेवक युवराज जगताप व शेख ईक्बाल यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. एमआयएमच्या फुटीर सात सदस्यीय गटाकडून डॉ. इद्रिस हाश्मी यांची वर्णी लागली.
सर्व प्रक्रिया चित्रीकरणात पार पडली. बैठक संपल्यानंतर काकू- नाना आघाडीचे पदाधिकारी घोषणा देत पालिकेच्या समोरील प्रांगणात एकत्रित आले. यावेळी गुलालाची उधळण करत आतषबाजीसह आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जि.प. सभापती संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, नगरसेवक अमर नाईकवाडे, फारुक पटेल, शाहेद पटेल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन दिवसांत सभापती निवडी
उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीनंतर येत्या तीन दिवसांत सभापती निवडीसाठी नगरसेवकांची पुन्हा बैठक होईल. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष हे प्रत्येकी एका समितीचे पदसिद्ध सभापती असतात. उर्वरित पाच विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार घेण्यात येतील, असे मुख्याधिकारी खांडकेकर यांनी सांगितले.
पालिकेला छावणीचे स्वरुप
क्षीरसागर काका- पुतण्यातील शह- काटशहाच्या राजकारणामुळे निवड प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सकाळपासूनच सतर्क होते. पालिकेला अक्षरश: छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. मतदान प्रक्रिया सुरु झाल्यावर पालिकेसमोरील वाहतूक बंद करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा ताफा तैना होता. सभागृहाबाहेर उपअधीक्षक गणेश गावडे तळ ठोकून होते. राज्य राखीव दलाच्या तुकडीसह ५० कर्मचारी तैनात होते. पालिका प्रवेशद्वारासमोर व प्रत्येक मजल्यावर पोलिसांची कुमक बंदोबस्ताला होती. (प्रतिनिधी)

Web Title: Kaka's neonatal heavy ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.