काकासाहेबाच्या भावाला दिली तीन किलोमिटर अंतरावर नोकरी; धार्मिक विधि झाल्यानंतर होणार रूजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 07:03 PM2018-07-27T19:03:28+5:302018-07-27T19:07:37+5:30
मराठा आरक्षणासाठी कायगाव टोक येथील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे याच्या कुटुंबियाला आधार देण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेतला आहे.
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी कायगाव टोक येथील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे याच्या कुटुंबियाला आधार देण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेतला आहे. काकासाहेबचा भाऊ अविनाश शिंदे याला कानडगावपासून तिन किलोमिटर अंतरावर असलेल्या ढोरेगाव येथील ‘मशिप्रमं’च्या शाळेत लिपिक पदाची नोकरी दिली आहे. अविनाश हा भावाचे सर्व धार्मीक विधि झाल्यानंतर रुजू होणार असल्याची माहिती मंडळाच्या कार्यालयातुन देण्यात आली.
मराठा आरक्षणासाठी कायगाव टोक येथील गोदावरी पात्रात केलेल्या जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाला. या मृत्युनंतर राज्यभरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. याचवेळी मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलनात पहिला बळी गेलेल्या काकासाहेब शिंदे याच्या कुटुंबियाला ५० लाखाची मदत, कुटुंबातील एकाला पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्याची मागणी केली होती. जिल्हाप्रशासनाने शासकीय नोकरीसह आर्थिक मदत देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर काकासाहेबाचा मृतदेह ताब्यात घेतला होता. या घटनेला दोन दिवस होताच मराठवाड्यातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या ‘मशिप्र’ मंडळाने काकासाहेबाच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचा निर्णय घेतला.
यानुसार काकासाहेबाच्या गावापासून तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या ढोरेगाव येथील शाळेत अविनाश यास ‘लिपिक’ पदाची नोकरी देण्यात आली आहे. ‘मशिप्र’ मंडळाचे सचिव आ. सतीश चव्हाण यांनी कानडगाव येथे काकासाहेबाच्या कुटुंबियाची भेट घेत सविस्तर चर्चा केली. यानंतर कुटुंबियाना नोकरी स्विकारण्यास होकार दर्शविला असून, काकासाहेबाचे धार्मिक विधि झाल्यानंतर शाळेत रूजू होण्यास सांगितले.
सरकारकडे मागितली विशेष परवानगी
राज्यात नोकरी भरतीवर बंदी असल्यामुळे कोणत्याही संस्थेला रिक्त जागा भरता येत नाहीत. मात्र विशेष बाब म्हणून अविनाश याच्या एका पदाला मान्यता देण्यासाठीचा प्रस्ताव ‘मशिप्र’ मंडळातर्फे शिक्षण विभागामार्फत मंत्रालयात पाठविण्यात आला असल्याचेही कार्यालयातुन सांगण्यात आले.
कर्तव्य पार पाडले
एका कुटुंबातील कमावता तरुण पोराचा दुर्दैवी मृत्यु होतो. अशा वेळी त्या कुटुंबाला मदत करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. यानुसार मंडळाने कुटुंबातील एका व्यक्तीला तात्काळ नोकरीवर घेण्याचा निर्णय घेतला. सरकारकडून मान्यता येईपर्यंत संबंधित पदाचा पगार मंडळातर्फे केला जाईल. तसेच या प्रस्तावाला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यास मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांनी होकार दर्शविला आहे.
- आ.सतीश चव्हाण, सरचिटणीस, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ