काकीनाडा दरोडा प्रकरणात 'चोर सोडून संन्याशाला शिक्षा'; संशयित प्रवासी मनमाड पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:21 AM2018-09-22T11:21:14+5:302018-09-22T11:22:40+5:30
साईनगर, शिर्डी ते काकीनाडा एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती.
औरंगाबाद : साईनगर, शिर्डी ते काकीनाडा एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती. मात्र, लुटमार करणारे फरार झाले अन् जनरलचे तिकीट काढून आरक्षित डब्यात प्रवास करणाऱ्या आठ प्रवाशांना संशयित म्हणून ताब्यात घेतल्याचे उघडकीस येत आहे. त्यांचे शुक्रवारी सकाळी मनमाड जनरल रेल्वे पोलिसांकडे हस्तांतरण करण्यात आले आहे.
साईनगर, शिर्डीहून काकीनाडाकडे जाणाऱ्या काकीनाडा एक्स्प्रेसच्या एस १ आणि एस ८ या दोन डब्यांमध्ये नगरसोल ते अंकाई किल्ल्यादरम्यान दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. यात चार महिलांचे दागिने लंपास करण्यात आले. दरोडेखोरांनी खिडक्यांतूनच ही लुटमार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, तर दुसरीकडे हा गोंधळ सुरू असतानाच काही प्रवाशांनीच चेन ओढून रेल्वे थांबवली. वैजापूर आणि येवल्याचे काही प्रवासी जनरल तिकीट काढून याच डब्यात घुसले होते. त्यांनाच दरोडेखोर समजून डब्यातील प्रवाशांनी चोप देण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबाद स्थानकावर आल्यानंतर आठ जणांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, प्रवाशांनी स्थानकावरच गोंधळ घालत रेल्वे पोलिसांवर आपला संताप व्यक्त केला. प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवताना दरोडेखोर किती होते हे नेमके समजू शकले नाही. मात्र, संशयित म्हणून भलत्याच व्यक्तींना ताब्यात घेण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांच्या तपासादरम्यान उघडकीस आले. नगरसोल रेल्वे पोलीस बलाचे सहायक निरीक्षक विजय वाघ यांनी शुक्रवारी आठही संशयितांना मनमाड जनरल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी सांगितले.
संशयित म्हणून अन्य प्रवासी ताब्यात
नगरसोल ते अंकाई किल्ल्यादरम्यान गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास काही प्रवाशांना लुटण्यात आले. मात्र, लुटमार करणारे फरार झाले, तर जनरल तिकीट काढून आरक्षित डब्यात प्रवास करणाऱ्यांनाच संशयित म्हणून अन्य प्रवाशांनी ताब्यात दिल्याचे आढळून आले आहे.
- दिलीप कांबळे, सहायक निरीक्षक, रेल्वे पोलीस बल, औरंगाबाद