‘काळा चबुतरा’ पूर्वी केवळ नाव घेताच ‘मृत्यूचे’ भय वाटत असलेली जागा आज बनले ‘प्रेरणास्थळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 06:59 PM2021-08-14T18:59:59+5:302021-08-14T19:04:10+5:30
Independence Day : १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात संपूर्ण दक्षिण भारतामध्ये फक्त औरंगाबाद येथेच इंग्रजांविरुद्ध क्रांती झाली होती.
- प्रभुदास पाटोळे
औरंगाबाद : पूर्वी तेथून जाणे तर सोडाच; परंतु केवळ नाव घेताच ‘मृत्यूचे’ भय वाटत असलेली औरंगाबादेतील ती जागा आज सर्वांसाठी ‘प्रेरणास्थळ’ बनले आहे, अशा पूर्वीच्या ‘काळा चबुतरा’लाच आज ‘क्रांती चौक’ ( Kranti Chowk ) म्हणून संबोधले जाते. त्याकाळी शहराच्या बाहेर असलेले हे स्थळ आज शहराच्या हृदयस्थानी (मध्यभागी) आले आहे. शहरातील कुठल्याही उत्सवाची, सामाजिक उपक्रमाची, कुठल्याही राजकीय पक्षाच्या सभेची, मिरवणुकीची, मोर्चाची अथवा उपोषणाची सुरुवात क्रांती चौकातूनच होत असल्यामुळे पूर्वी भीतीदायक असलेली जागा आज सर्वांसाठी प्रेरणास्थळ बनली आहे. ( ‘Kala Chabutra’ used to be a place of fear of ‘death’ just by taking its name, today it has become a ‘place of inspiration’ )
या जागेमागे अत्यंत प्रेरणादायक इतिहास आहे. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात संपूर्ण दक्षिण भारतामध्ये फक्त औरंगाबाद येथेच इंग्रजांविरुद्ध क्रांती झाली होती. औरंगाबादेतील ‘काळा चबुतरा’ येथे ३ क्रांतिकारकांना तोफेच्या तोंडी आणि २१ क्रांतिकारकांना फाशी दिले होते. या २४ क्रांतिकारकांच्या बलिदानाने पडलेल्या क्रांतीच्या ठिणगीने देशभरात स्वातंत्र्यलढ्याचा वणवा पेटला होता, अशी माहिती येथील इतिहासतज्ज्ञ डॉ. शेख रमझान यांनी प्रकाशित केलेल्या ‘औरंगाबादचे १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध’ या पुस्तिकेत दिली आहे.
इतिहासाची पाने उलगडता...
पुस्तकात म्हटल्यानुसार तात्याराव टोपे आणि नानासाहेब पेशवे यांनी औरंगाबादेतील इंग्रजी फौजेतील हिंदू आणि मुस्लीम तुकड्यांमध्ये इंग्रजांविरुद्ध विद्रोहाची प्रेरणा निर्माण केली होती. ९ ते १९ जून १८५७ दरम्यानच्या घटनांवरून औरंगाबादेतील क्रांतीची चाहूल इंग्रजांना लागली होती. नाशिकहून कॅप्टन आबट सैन्यासह औरंगाबादला पोहोचले. त्यानंतर अहमदनगरहून जनरल उडबर्न सैन्यासह औरंगाबादला पोहोचले. क्रांती चौकात त्यांनी बंडखोर सैनिकांची नावे वाचून दाखविली. जमादार आमिरखान यांनी कॅप्टन आबटवर गोळी झाडली. मात्र, नेम चुकून तो वाचला. या घटनेनंतर २३ जून १८५७ ला क्रांतिकारकांवर खटले चालवून, लोकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी तीन क्रांतिकारकांना तोफेला बांधून पैठणगेट ते क्रांती चौकापर्यंत वाजंत्रीसह धिंड काढण्यात आली. त्या तिघांना काला चबुतऱ्यावर तोफेच्या तोंडी दिले, तर २१ क्रांतिकारकांना फासावर लटकवले होते, म्हणून त्या जागेला क्रांती चौक म्हणतात.
हेच ते विद्रोही क्रांतिकारक
इंग्रजी फौजेतील हिंदू आणि मुस्लीम तुकड्यांमध्ये तात्याराव टोपे आणि नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांविरुद्ध निर्माण केलेल्या विद्रोहाच्या प्रेरणेतून जमादार आमिरखान, मोदी खान, जांबाज खान, शेख रहीम, मो. मीर खान, शेख फतेह मोहंमद, मोहम्मद रजा, दिलावर खान, शेख हुसेन, मिर्झा अजीज बेग, हुसेन खान, शेख मलईक, अहमद खान, मीर मझहर खान, नूर खान, मीर इमाम अली, मीर बदर अली, कासीम अली खान, फैज मोहम्मद खान आणि अब्दुल्ला खान यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात औरंगाबादेत बलिदान दिल्याची नोंद हैदराबादच्या जनरल रेकॉर्ड, फाइल क्रमांक ३२ मध्ये आणि औरंगाबाद जिल्ह्याचे तत्कालीन (१८५७ चे) जिल्हाधिकारी फरदुनजी जमशेटजी यांनी लेखी स्वरूपात ठेवलेली आहे, हे विशेष.
आज तेथे २१० फूट उंच तिरंगा
क्रांतीच्या या स्मृतीनिमित्त या चौकात झाशीच्या राणीचा पुतळा औरंगाबाद नगर परिषदेच्या वतीने बसविण्यात आला. नंतरच्या काळात चौकाच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. झाशीच्या राणीच्या पुतळ्याच्या बाजूला २०१७ मध्ये २१० फूट उंच तिरंगा ध्वज फडकाविण्यात आला. यामुळे औरंगाबादच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. सध्या हे ठिकाण शहरातील नागरिकांचे, तसेच पर्यटकांच्या भेटी देण्याचे ठिकाण बनले आहे.