हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक नागपंचमीला ‘कलगीतुरा’ रंगला; हर्सूलमध्ये १५० वर्षांची परंपरा टिकून
By प्रशांत तेलवाडकर | Published: August 22, 2023 07:39 PM2023-08-22T19:39:19+5:302023-08-22T19:39:57+5:30
मागील १५० वर्षांपासून हर्सूलमध्ये नागपंचमीला कलगीतुरा रंगत असतो.
छत्रपती संभाजीनगर : ‘मै धोंडे का महिना कहे तो सूनो कविराया, वह धोंडा है कोन किसी को पता मूल पाया,’ असे कलगीतुरेवाल्यांनी गाण्यातून प्रश्न केला आणि तुरेवाल्या म्हणाले की, ‘धोंडे का छंद गाते करते बढाई, आज मैफील मै धोंडे का जवाब सूनो भाई’... असा सवाल, जवाबचा ‘कलगीतुरा’ नागपंचमीच्या निमित्ताने हर्सूलमध्ये ६ तास रंगला... यासाठी पंचक्रोशीतील ३०० पेक्षा अधिक नागरिक जमा झाले होते.
या कलगीतुऱ्यात हिंदूंसोबतमुस्लीम भाईही सहभागी झाले होते. ही काही आजची परंपरा नसून मागील १५० वर्षांपासून हर्सूलमध्ये नागपंचमीला कलगीतुरा रंगत असतो. शहरात समावेश होऊनही हर्सूलकरांनी व आसपासच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी आपली ग्रामीण संस्कृती जपून ठेवली आहे. याचे ‘कलगीतुरा’ हे एक उत्तम उदाहरण होय.
हर्सूलच नव्हे तर चिमणपीरवाडी, गोलवाडी, हर्सूल-सावंगी, बेगमपुरा, चिकलठाणा, मुकुंदवाडी, पळशी, बिडकीन आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या पश्चिम बाजूला असलेल्या गल्लीत सकाळी ११ वाजता कलगीतुऱ्याला सुरुवात झाली. सर्वप्रथम सर्वांना मानाचा ‘फेटा’ बांधण्यात आला. आणि सुरू झाले टाळ व ढोलकीच्या ठेक्यावर गाणे. महाभारत, रामायण, पुराणकथा आदींचा संदर्भ घेऊन प्रश्न विचारले जात होते आणि त्यास तेवढ्याच तोडीने उत्तरही दिले जात होते. यात कलगीवाल्यांकडून टेकचंद वाणी, हिरामन वस्ताद (हर्सूल) यांनी प्रश्न विचारले तर ‘तुरेवाल्याकडून माहदू बागडे (जटवाडा), रामकिशन वस्ताद (चिमनपीरवाडी), गंगाराम वाणी (पडेगाव) यांनी उत्तरे दिली. त्यांना हरिभाऊ खंडागळे यांनी साथ दिली. यशस्वितेसाठी पूनम बमणे, रूपचंद गुंजाळ, रूपचंद हरणे, बाबू गुंजाळ, हरिदास हरणे आदींनी परिश्रम घेतले.
सुरुवातीला मुस्लीम बांधवांनी जपली परंपरा
हर्सूलमध्ये १५० वर्षांपासून नागपंचमीला कलगीतुरा आयोजित केला जातो. ही परंपरा हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक बनली आहे. सुरुवातीला अजीत बाबा पटेल, गुलाम पटेल, शेख अमीर, शेख नुरखान यांनीही मौखिक परंपरा कायम ठेवली. काव्यातून त्यांच्या नावाचा आजही उल्लेख होतो. ‘शहाअली नुरखान छंद लिखते तुरेवाले शर्माते‘ असा उल्लेख कलगीतुऱ्यात आजही करतात.
- फकीरचंद हरणे, आयोजक समिती
चंपाषष्ठीला साताऱ्यात एकत्र येतात सर्व कलगीतुरेवाले
जिल्ह्यात आजघडीला २० पेक्षा अधिक कलगीतुरा पथक कार्यरत आहेत. वर्षभर विविध गावात कलगीतुऱ्याचे कार्यक्रम होत असतात. पण हे सर्वजण सातारा खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीच्या निमित्ताने दरवर्षी एकत्र येत असतात. तो दिवस या कलगीतुरेवाल्यांसाठी मोठा वार्षिक उत्सवच असतो.