कालिदासाच्या तोडीचा कवी पुन्हा जन्माला आला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:16 AM2018-02-15T00:16:01+5:302018-02-15T00:16:08+5:30
‘मला कवी कालिदास पांडुरंगाच्या वारीच्या वाटेवर दिसतात. कालिदासाची सौंदर्यदृष्टी आजच्या कवींना लाजवणारी आहे. कालिदासाच्या तोडीचा कवी पुन्हा जन्माला आला नाही’ असे उद्गार आज येथे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे (पुणे) यांनी गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी, स. भु. परिसर येथे काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘मला कवी कालिदास पांडुरंगाच्या वारीच्या वाटेवर दिसतात. कालिदासाची सौंदर्यदृष्टी आजच्या कवींना लाजवणारी आहे. कालिदासाच्या तोडीचा कवी पुन्हा जन्माला आला नाही’ असे उद्गार आज येथे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे (पुणे) यांनी गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी, स. भु. परिसर येथे काढले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, औरंगाबादच्या वतीने देण्यात आलेल्या स्वा. सै. कै. वि. वा. देसाई ( देशपांडे) स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ‘कवी कालिदास आणि परंपरा’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. बी. वराडे हे अध्यक्षस्थानी होते. यंदाचा हा पुरस्कार वेद प्रतिष्ठान, औरंगाबादला देण्यात आला. तो डॉ. अशोक देव यांनी स्वीकारला. ११ हजार रु. रोख व स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. गतवर्षी प्रा. डॉ. सुहास पाठक व त्यांच्या सहकाºयांनी‘शिक्षण हक्क कायदा आणि मराठवाडा’ हा संशोधन प्रकल्प डॉ. अश्विनी वैष्णव व त्यांच्या सहकाºयांनी ‘औरंगाबाद जिल्ह्यातील शालेय ग्रंथालय’ हा संशोधन प्रकल्प स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेस सादर केला. यानिमित्त या सर्वांचा आजच्या या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. प्रारंभी, संस्थेचे सचिव डॉ. शरद अदवंत व वृंदा देशपांडे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. मोहन फुले यांनी सूत्रसंचालन केले तर जगदीश जोशी यांनी शेवटी आभार मानले.
वेद घरोघरी जावा, अशी अपेक्षा पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. देव यांनी व्यक्त केली.
आपल्या भाषणात डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, आपल्यासाठी ज्ञानेश्वरीच वेद होय. संतसाहित्य हाच महाराष्ट्राचा पाचवा वेद असून, वेदांवरच भारतीय संस्कृती अवलंबून आहे. अव्यक्त ज्ञानाचा व्यक्त आविष्कार म्हणजे वेद होय. वेद वाङ्मय पुरोगामी विचारांवर व विज्ञानावर आधारित आहे. त्यात अंधश्रद्धा नाही.
भाषा टिकविण्यासाठी संस्कृती टिकविण्याची गरज आहे. ९० टक्के साहित्य हे काव्यांनी व्यापलेले असते. कविता हा संवेदनांचा उत्सव होय. कवी या शब्दाचा अर्थ द्रष्टा, सर्वज्ञ, ज्ञाता, प्रतिभासंपन्न असा होतो. संवेदनांशिवाय साहित्यनिर्मिती होतच नाही. कालिदास, भवभूती, माग, हर्ष, पाणिनी, अश्वघोष,भार्गवी, भास, दंडी, जयदेव ते पं. जगन्नाथांपर्यंतचा हा समृद्ध वारसा आहे. आजही कालिदास हवाय. त्याच्या प्रतिभेने पाश्चात्य कवीसुद्धा प्रभावित झाले, याकडे देखणे यांनी लक्ष
वेधले.