कालवण, खमंग पोहे, भेळवर भुरभुरण्यासाठी असलेली कोथिंबीर गायब

By प्रशांत तेलवाडकर | Published: June 13, 2024 04:57 PM2024-06-13T16:57:34+5:302024-06-13T17:20:32+5:30

कोथिंबीर महाग झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना तिचे महत्त्व कळत आहे.

Kalvan, Khamang Pohe, Coriander for crumbing on meal are missing | कालवण, खमंग पोहे, भेळवर भुरभुरण्यासाठी असलेली कोथिंबीर गायब

कालवण, खमंग पोहे, भेळवर भुरभुरण्यासाठी असलेली कोथिंबीर गायब

छत्रपती संभाजीनगर : एरवी १० रुपयांना मिळणारी कोथिंबीर सध्या २० रुपयांना मिळत आहे. मोठा भेलाचे भाव ६० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. यामुळेच कालवण, खमंग पोहे, भेळ यावर भुरभुरण्यासाठी व चवीसाठी लागणारी कोथिंबीर गायब होत आहे. कोथिंबीर महाग झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना तिचे महत्त्व कळत आहे. अनेक ग्राहक असे आहेत की, किती महाग असली तरी कोथिंबीर खरेदी करणारच. मात्र, उत्पादन कमी असल्याने या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही, हेही तेवढेच सत्य आहे.

कोथिंबीर ६० रुपयांना भेला
भाजीमंडईत कोथिंबीर २० रुपयांना जुडी मिळत आहे. मोठा भेला तर ग्राहकांच्या नजरेस पडतच नाही. जाधववाडी अडत बाजार, बीड बायपास रोड, मुकुंदवाडी भाजीमंडई या व अन्य भागांतच कोथिंबीरचा भेला पाहण्यास मिळतो. जाधववाडीतून ६० रुपयांना भेला खरेदी करून त्याच्या लहान-लहान जुडी तयार करून त्या २० रुपयांना विकल्या जात आहेत. सध्या कोथिंबीरचा तुटवडा जाणवत आहे.

पालेभाज्यांचे भाव काय?
प्रकार---जुडी

कोथिंबीर २० रु.
मेथी २० रु.
शेपू १५ रु.
पालक १०रु.
करडी १०रु.
कांदा पात १०रु.

श्रावण घेवडा २००रुपये
भाज्यांमध्ये मागील महिनाभरापासून श्रावण घेवडा (बिन्स) २०० रुपये किलोने विकला जात आहे. फुलगोबी ८०रुपये, तर भेंडीही ८० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. आता पावसाळ्याला सुरुवात होत आहे आणि लातूर व हैदराबाद या भागांतून लिंबांची आवक वाढल्याने लिंबांचे भाव कमी होऊन १०० रुपयांवर येऊन ठेपले आहेत.

कांदा २५, बटाटा ३० रुपये
सध्या सर्वांत स्वस्त म्हणजे कांदा व बटाटाच आहे. नवीन उन्हाळी कांदा बाजारात येत असून ३०रुपये किलोने विक्री होणारा कांदा आता २५ रुपयांना विकत आहे. तर बटाट्याचे भाव ३० रुपयेच आहेत. यामुळे घरोघरी कांदा व बटाट्याच्या भाज्या केल्या जात आहे. मुला-मुलींना बटाट्याची भाजी खूप आवडते. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून, अनेकदा डब्यामध्ये बटाट्याची भाजी दिली जाते. यामुळे सध्या बटाटा आर्वजून खरेदी केला जात आहे.

पालेभाज्या जेवणात लागतातच
पालेभाज्यांचे कितीही भाव वाढले तरी जेवणात त्या लागतातच. दररोजच्या जेवणात पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी उत्तम असते. यामुळे मेथी असो पालक असो वा कोथिंबीर दररोजच्या जेवणात असतेच.
-ज्योती धारूरकर, गृहिणी
 

 

 

Web Title: Kalvan, Khamang Pohe, Coriander for crumbing on meal are missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.