‘कमळाबाई’ शिवसेनेचे उपकार विसरली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:36 AM2017-10-30T01:36:19+5:302017-10-30T01:36:39+5:30
शिवसेनेचे बोट धरून राजकारणात आलेल्या ‘कमळाबाई’चे नखरे वाढले असून, उपकार विसरलेल्या ‘कमळाबाई’चा बंदोबस्त करण्याची वेळ आल्याची टीका राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांचे नाव न घेता केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शिवसेनेचे बोट धरून राजकारणात आलेल्या ‘कमळाबाई’चे नखरे वाढले असून, उपकार विसरलेल्या ‘कमळाबाई’चा बंदोबस्त करण्याची वेळ आल्याची टीका राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांचे नाव न घेता केली. रविवारी सायंकाळी नूतन वसाहतमध्ये आयोजित रमाई स्वर्गरथ लोकार्पण आणि रमाई ग्रुप आणि अल फतेह गु्रपच्या वतीने आयोजित शिवसेनेत जाहीर प्रवेश सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, शहरप्र्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, माजी आ. संतोष सांबरे, भाऊसाहेब घुगे, सुधाकर निकाळजे, अॅड. भास्कर मगरे, आत्मानंद भक्त, पंडित भुतेकर, बालाजी कल्याणकर, नगरसेवक अशोक पांगारकर आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
खोतकर म्हणाले की, लोकसभेला शिवसेना तुमच्या पाठीशी उभी राहिल्यामुळे तुम्ही चार वेळेस लोकसभेत पोहोचलात. मात्र सत्ता डोक्यात गेल्यामुळे तुम्ही शिवसेनेचे उपकार विसरलात. सेनेच्या वाघावर जाळे टाकणे तुम्हाला महाग पडले. आमचा भाजपाला विरोध नसून त्यांच्या प्रवृत्तीला आहे. ६० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या डोक्यात सत्ता गेली नाही, मात्र भाजप तीन वर्षात सत्तेची भाषा बोलत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या पक्षाची खिल्ली उडवली जात असल्याचे खोतकर म्हणाले. लवकरच सर्वांना पीआरकार्ड व रमाई घरकुल योजनेचा फायदा मिळवू दिला जाईल. दलित वस्ती योजनेअंतर्गत या भागात विविध विकास कामे करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली. अॅड. बबन मगरे व अॅड. अशपाक पठाण यांच्यासह त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.