औरंगाबाद रेल्वे स्टेशनमध्ये कुलींचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 07:41 PM2018-02-28T19:41:16+5:302018-02-28T19:41:30+5:30
लिफ्ट, सरकता जिना आणि चाके असणारी सुटकेस, बॅगांमुळे रेल्वेस्टेशनवरील कुलींना काम मिळणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. त्यामुळे कुलींनी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान कामबंद आंदोलन करून मागण्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबाद : लिफ्ट, सरकता जिना आणि चाके असणारी सुटकेस, बॅगांमुळे रेल्वेस्टेशनवरील कुलींना काम मिळणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. त्यामुळे कुलींनी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान कामबंद आंदोलन करून मागण्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
कुलींना रेल्वेच्या गुप ‘डी’मध्ये नोकरी देण्यात यावी, चतुर्थ श्रेणीत गँगमनची नोकरी देण्यात यावी,यासह विविध मागण्या औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील कुलींनी केली आहे. मीराबाई मेवाड, महेंद्र वाव्हळे, युसूफ शाह, संतोष भालेराव, राहुल दुसिंग, सचिन कंगारे, जाय डेव्हिड दास, शेख रफीक, विनायक भिसे, गणेश पोळके आदी कुलींनी कामबंद आंदोलन केले. २००८ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी कुलींना संधी देत ट्रॅकमनची नोकरी दिली. त्यामुळे नवीन आशा निर्माण झाली; परंतु त्यानंतर कुलींकडे कोणीही लक्ष दिले नाही. आधुनिकीकरणाने रेल्वेस्टेशनवर काम मिळणे अवघड होत आहे. कामबंद आंदोलनादरम्यान कुलींनी सामाजिक जबाबदारी जोपासत ज्येष्ठ, दिव्यांगांना मोफत सेवा दिली. त्यामुळे ज्येष्ठांनी त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.