उंडणगावात कान्होबाच्या रामकाठीची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:04 AM2021-03-21T04:04:22+5:302021-03-21T04:04:22+5:30
उंडणगाव : येथील मढी येथून आणलेल्या कान्होबाच्या रामकाठीची वाजत गाजत भंडारा उधळत भव्य मिरवणूक काढण्यात आली. गेल्या दीडशे वर्षांपासून ...
उंडणगाव : येथील मढी येथून आणलेल्या कान्होबाच्या रामकाठीची वाजत गाजत भंडारा उधळत भव्य मिरवणूक काढण्यात आली. गेल्या दीडशे वर्षांपासून ही परंपरा धनगर समाज जोपासत आहे. या मिरवणुकीच्या वेळी धनगर समाज बांधवांची उपस्थिती होती.
उंडणगावात धनगर समाजाची मोठी संख्या आहे. कुलदैवत असलेल्या खंडोबा महाराज यांच्या जवळील असलेल्या मढी येथून कान्होबाची रामकाठी आणलेली आहे. या कान्होबाच्या रामकाठीला दीडशे वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा, लोककला येथील धनगर समाज मोठ्या आनंदाने जोपासत आहे. महाशिवरात्रीच्या दुुसऱ्या दिवशी या कान्होबाच्या रामकाठीला आंघोळ घालण्यात येते. नवीन वस्त्र परिधान करण्यात येतात. बस स्थानकापासून गावात वाजत गाजत भंडारा उधळत भव्य मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक धनगर गल्लीपर्यंत येते. या रामकाठीची उंच किमान ३० फूट आहे. या रामकाठीला मिरवणुकीदरम्यान डफड्याच्या तालावर कोणी दातावर, डोक्यावर, खांद्यावर, हातावर असे घेऊन नाचतात. या रामकाठीचे मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी खाली उतरून टाकतात.
या मिरवणुकीत उपसरपंच दत्तात्रय बोराडे, कडुबा बोराडे, नाना बोराडे, रमेश बोराडे, पंकज जयस्वाल, प्रकाश बोराडे, अशोक सावळे, दत्तात्रय सावळे बाळा सावळे, अमोल सावळे, भागीनाथ साबळे, रामेश्वर साबळे, चंद्रकांत बोराडे, सोनाजी बोराडे, जनार्दन बोराडे, प्रभाकर बोराडे, डिंगाबर सावळे, बाबुराव बोराडे, शांताराम बोराडे, गजानन बोराडे, कारभारी बोराडे आदी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फोटो : उंडणगाव येथील कान्होबाच्या रामकाठीची भव्य दिव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. भाविक काठीला खांद्यावर, हातावर घेऊन डफड्याच्या तालावर नाचतात.